सोलापूर: पंढरपूर तालुक्यातील करकंब (Karakamb Pandharpur) येथील मोडनिंब रोडलगत असलेल्या परदेशी यांच्या शेततलावात पडून तीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. मनोज अंकुश पवार (वय 11 वर्षे), गणेश नितीन मुरकुटे (वय 7 वर्षे), हर्षवर्धन नितीन मुरकुटे (वय 9 वर्षे) अशी बुडालेल्या मुलांची नावं आहेत.
करकंब शहरालगत असलेल्या मोडनिंब रोडवरील परदेशी यांच्या शेतात असलेल्या पाण्याच्या टॅंकमध्ये तीन लहान मुले पडल्याची घटना करकंब परिसरात वाऱ्यासारखी पसरली. या घटनेची माहिती मिळताच करकंब पोलिसांनी तात्काळ सदर ठिकाणी धाव घेऊन या तलावातून या तीनही शाळकरी मुलांना बाहेर काढलं. नंतर त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे करकंब व परिसरात शोककळा पसरली आहे.
छ. संभाजीनरगमध्ये तलावात बुडून चार मुलांचा दुर्देवी मृत्यू
संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील एका तलावात बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात बुडालेल्या चारही मुलांना बाहेर काढून घाटी दवाखान्यात पाठवले, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. बिस्वजित सुखदेव उपाध्याय कुमार (वय 12 वर्षे), अफरोज जावेद शेख (वय 12 वर्षे), जावेद शेख (वय 14 वर्षे), अबरार जावेद शेख (वय 12वर्षे) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या चारही मुलांची नावं आहे.
अधिक माहितीनुसार, संभाजीनगरच्या वाळूज महानगर परिसरात असलेल्या रांजणगाव शेणपुंजी परिसरात असलेल्या तलावात काही मुलं पोहण्यासाठी गेली होती. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने चार मुलं पाण्यात बुडाली. या घटनेची माहिती मिळताच परीसरातील नागरिकांसह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोबतच तहसीलदार देखील घटनास्थळी पोहचले. तसेच याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली.
त्यांनतर अग्निशमन दलाने पाण्यात बुडालेल्या चारही मुलांना बाहेर काढले आहे. मात्र या चारही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यानंतर या मुलांचा मृतदेह शहरातील शासकीय घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मुलांचे मृतदेह पाहून नातेवाईकांनी हंबरडा फोडला. या दुर्दैवी घटनेमुळे रांजणगाव शेणपुंजी परिसरात आणि गावात शोककळा पसरल्याचं पाहायला मिळाले.
ही बातमी वाचा: