Ramesh Kadam: बोगस लाभार्थीच्या नावे कर्ज काढून महामंडळाची फसवणूक केल्याप्रकरणी मोहोळचे माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे (Solapur District Court) न्यायाधीश आर.एन. पांढरे यांनी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. रमेश कदम यांनी आज्जी बायम्मा गणपत क्षीरसागर यांच्या नावे दुग्धव्यवसाय करणेसाठी बेकायदेशीररित्या कर्ज मंजुरीचे आदेश काढले. त्यानंतर ते कर्ज वितरण करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव आणला आणि शासनाची तसेच महामंडळाची 6 लाख 36 हजार 658 रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. 


जवळपास 7 वर्षांपूर्वी दाखल झालेल्या ह्या गुन्ह्यात माजी आमदार रमेश कदम यांना जामीन मंजूर झाला. अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपीतर्फे अॅड. मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात फिर्याद उशिराने दाखल झालेली आहे. तसेच कर्ज मंजुरीची रक्कम ही देखील लाभार्थी बायम्मा क्षिरसागर हिच्या खात्यामधून फ्रीझ केलेली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास आता पूर्णत्वात आला असल्याचा युक्तिवाद मांडला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने कदम यांना जामीन मंजूर केला. पण माजी आमदार रमेश कदम यांच्या विरोधात अद्यापही अनेक प्रकरणे विविध न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यामुळे त्यांची इतक्या तुरुंगातून सुटका होणार नसल्याची माहिती आहे.  सध्या रमेश कदम हे आर्थर रोड तुरुंगात आहेत. 


तीन महिन्यापूर्वी जामीन मंजूर 


अण्णाभाऊसाठे महामंडळ घोटाळा प्रकरणी (Annabhau Sathe Mahamandal scam case ) माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam ) यांना तब्बल आठ वर्षांनी जामीन मंजूर झाला. मार्च महिन्यात हा जामीन मंजूर करण्यात आला होता. हायकोर्टाने जामीन मंजूर केला होता. 


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ घोटाळ्यात रमेश कदम हे मुख्य आरोपी आहेत. महामंडळाच्या अध्यक्षपदी असताना बोगस लाभार्थी दाखवून रमेश कदमांनी शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी रमेश कदम यांना आठ वर्षापूर्वी अटक केली होती. याच घोटाळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना पक्षातून निलंबित केलं आहे.  अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळा घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम यांना ऑगस्ट, 2015 मध्ये अटक करण्यात आली होती. 


तुरुंगातही वादात 


दरम्यानच्या काळात या ना त्या कारणानं रमेश कदम सतत चर्चेत राहिलेत. मागे एका व्हिडीओ क्लीपमध्ये कदम आर्थर रोड जेलमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करत असल्याचं दिसलं होतं. त्यासंदर्भात रमेश कदम यांच्याविरोधात नागपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. मात्र, 'पोलिसांनीच मला जातीवाचक शिवीगाळ केली आणि 25 हजारांची लाच मागितली' असा त्यांचा दावा होता. तसेच भायखळा जेलमध्ये असताना वॉर्डन मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणातही प्रकरणातही रमेश कदम यांनी पोलिसांवर आरोप केले होते.