सोलापूर : उन्हाळ्याच्या तापलेल्या वातावरणात पाण्यासाठी सर्वत्र भटंकती पाहायला मिळत आहे. नद्याचं पाणी आटलं असून धरणांचीही (Dam) पाणीपातळी खालावली आहे. गावच्या टाक्यांमध्येही पाणी दिसेना, तर नळातून पाणी येण्यासाठी 8 ते 10 दिवसांची वाट पाहावी लागत आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत तेच चित्र आहे. सोलापूरही त्यासाठी मागे नाही, सोलापूकरही तहानलेलेच आहेत. मात्र, तहानलेल्या सोलापूराची (Solapur) तहान भागवण्यासाठी उजनी धरणातून 10 मे रोजी सोडलेले पाणी आज चंद्रभागेच्या पात्रात आले असून पुढील ४ ते ५ दिवसात सोलापूरला हे पाणी (Water) पोहोचणार आहे. त्यामुळे, ऐन मे महिन्याच्या उतरार्धात पाणी पोहोचल्याने सोलापूरकरांची मोठी अडचण दूर होणार आहे.
यंदाच्या तीव्र दुष्काळामुळे सोलापूर शहरातही मोठी पाणी टंचाई जाणवत असून हजारो नागरिकांना याचा फटका बसत होता. मात्र, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचनेनुसार उजनी धरणातून सोलापूरची सहा हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली होती. उजनी धरणाची अवस्थाही बिकट असून सध्या धरण वजा पन्नास टक्के इतक्या पातळीला पोहोचले आहे. तरीही, धरणाच्या चार गाळ मोरीतून पाणी सोडण्यात येत आहे. आज सकाळीपासून धरणातून सोडलेलं हे पाणी चंद्रभागेत पोहोचले असून गेल्या दीड महिन्यांपासून कोरडी पडलेली चंद्रभागा आता दुथडी भरून वाहू लागली आहे. आता, हे पाणी मंगळवेढा मार्गे सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औज व चिंचपूर बंधाऱ्यात साधारण 20 किंवा 21 मे पर्यंत पोहोचणार आहे . त्यानंतर सोलापुरवरील जलसंकट दूर होणार असले तरी आता पाऊस येईपर्यंत पुन्हा उजनी धरणातून पिण्यासाठी देखील पाणी सोडणे अशक्य बनणार आहे. त्यामुळे, आता पाठवण्यात आलेलं पाणी काटकसरीनेच वापरावे लागणार आहे.
कोळी बांधवांनी केलं पूजन
दरम्यान, गेल्या दीड महिन्यांपासून कोरड्या पडलेल्या चंद्रभागेत हे पाणी पोहोचल्याने आता चंद्रभागेत होड्या फिरतानाचे दृश्य दिसू लागले आहे. कोळी बांधवानी आज सकाळीच चंद्रभागेचे पूजन करुन आरती केली. यावेळी, कोळी बांधवांच्या चेहऱ्यावरील आनंदात सर्वकाही सांगून जात होता. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे देवदर्शन धार्मिक पर्यटनासाठी भाविकांची व पर्यटकांची गर्दी दिसून ये आहे. पंढरीच्या चंद्रभागेत पाणी आल्याने सुट्ट्यांसाठी येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांनी चंद्रभागा स्नानसोबत नौकाविहाराचा आनंदही घेत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
हेही वाचा
कार्यकर्त्याला हात लावाल तर याद राखा, आम्ही मुळावर घाव टाकू, निंबाळकरांचा मोहिते पाटलांना इशारा