Ranjeetsingh Nimbalkar on Mohite Patil: आमच्या कार्यकर्त्याला हात लावाल तर याद राखा, असे म्हणत खासदार रणजितसिंह निंबाळकर (Ranjeetsingh Nimbalkar) यांनी भर सभेत मोहिते पाटलांना (Mohite Patil) दम भरला आहे. यावरुन मतदान होऊनही माढा लोकसभेत (Madha Loksabha) धुसफूस सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे. काल मोहिते पाटलांसह उत्तमराव जानकरांनी फलटणमध्ये पाण्याच्या प्रश्नावरुन मोर्चा आयोजीत केला होता. यानंतर आज माळशिरमधील जाहीरस सभेत निंबाळकरांनी मोहिते पाटलांवर जोरदार टीका केली.


रणजितसिंह निंबाळकर यांनी माळशिरस तालुक्यातील एका सभेत मोहिते पाटलांना सज्जड दम भरला आहे. माढा लोकसभेचे निवडणूक 7 मे रोजी झाली आहे.  यानंतर सर्वत्र शांतता राहील असे वाटत होते. मात्र यानंतर मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांनी नीरा कळवा पाण्यावरुन थेट फलटण येथे मोर्चा नेत प्रशासनाला धारेवर धरले होते. यानंतर काल रात्री माळशिरस तालुक्यातील दहिगाव येथे महायुतीच्यावतीने स्नेह मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला खासादर रणजितसिंह नाईक निंबाळकर,आमदार जयकुमार गोरे धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासह भाजपाचे आप्पासाहेब देशमुख आणि माळशिरस तालुक्यातील निष्ठावान कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने हजेरी होती. यावेळी खासदार रणजित निंबाळकर यांनी उत्तम जानकर आणि मोहिते पाटील यांच्यावर सडकून टीका केली. 


आम्ही काय लुंगेसुंगे वाटलो काय? 


इथे कोणाच्या केसाला धक्का लावला तर केसात कंगवा घालू देणार नाही आणि कोणाचे जर वाकडे करण्याचा प्रयत्न केला तर तो आयुष्यभर वाकडा चालेल असा इशारा निंबाळकरांनी दिला. त्यामुळं कोणत्या कार्यकर्त्याला धक्का लावण्याचा प्रयत्न झाला तर आता सर्व सक्षम झाले असल्याचे निंबाळकर म्हणाले. हे जर इथे दहशत निर्माण करायला गेले तर त्यांना पेट्या भरायला लावून त्यांच्या घराला कुलूप लावायला नाही गेलो तर नाव बदलून टाकीन असा थेट दम देखील निंबाळकरांनी भरला. यांची दहशत काय आहे ती एकदा काढायची आहे. आम्ही काय लुंगेसुंगे वाटलो काय? असा सवालही निंबाळकरांनी केला. शेजारच्या ज्या बारामतीच्या जीवावर तुम्ही हे करत असाल, तर त्यांना विचार आम्ही काय आहोत? अशा शब्दात निंबाळकरांनी मोहिते पाटलांना इशारा दिला . 


आम्ही मुळावर घाव टाकू


आमचे सगळे मोकळे आहे , ओपन चित्रपट आहे, लोकांसाठी काहीही करावे लागले तरी आमची ए टू झेड सगळी करायची तयारी असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. पुढे म्होरके पाठवून मागे थांबणाऱ्याची आमची अवलाद नाही. कायमच माझ्या बाह्या सरसावलेल्या असतात असे निंबाळकर म्हणाले. यांनी प्रयत्न करुन बघावं मग कळेल चुकून यांच्या नादाला लागलो. चुकून निवडणुकीला उभारलो हे त्यांना चार जूनला समजेलच असा टोलाही त्यांनी लगावला. निकालानंतर माझ्या एकजरी सहकार्याला कार्यकर्त्याला त्रास झाला तर तो सहन केला जाणार नाही.  आम्ही मुळावर घाव टाकू. फांद्या छाटत बसणाऱ्यांपैकी आम्ही नाही असा इशाराही निंबाळकरांनी दिला आहे.


मोहिते पाटलांनी आमदारांना कशी वागणूक दिली?


मोहिते पाटील यांच्यावर टोलेबाजी करताना येथील आमदारांना कशी वागणूक दिली. इथे ऑफिस काढायचे नाही, बंगल्यात येऊन काम करायचे. मात्र, याला राम सातपुते यांनी किंमत दिली नाही. तो दमदार कार्यकर्ता असल्याने त्याने तालुक्यातील कायम वंचित राहिलेल्या 54 गावांना निधी देण्याचा प्रयत्न केल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. 


जानकरांनी आत्मपरीक्षण करावे


उत्तम जानकर यांच्यावर टोलेबाजी करताना निंबाळकर म्हणाले की, एका सभेत हे खुर्चीवर बसलेत आणि हे खूळं खाली बसलंय असा टोला जानकरांना लगावला. धनगर समाजाने त्यांना नेतृत्व दिले ते काय यांच्या चपलेपाशी बसण्यासाठी का? असा सवालही निंबाळकरांनी केला. अशी लायकी काढून असली आमदारकी मिळवण्यात काय अर्थ? असा टोलाही उत्तम जानकर यांना लगावला. जानकरांनी आत्मपरीक्षण करावे असे सांगत, चपलेपाशी बसून तुम्ही आमदार व्हायला निघाला असला तरी जनता निघालेली नाही. जनता तुम्हाला निवडून देणार नाही, असा टोलाही रणजितसिंह निंबाळकर यांनी लगावला. 


एकाही कार्यकर्त्याला त्रास झाला तर याद राखा


माढा लोकसभा मतदारसंघ निवडणूक जाहीर झाल्यापासून चर्चेत होता. या मतदारसंघात मोहिते पाटील यांची दहशत आणि गुंडगिरी मोडून काढू असा इशारा थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिला होता. आता तीच भाषा रणजितसिंह निंबाळकर यांनी केली आहे. माळशिरस तालुक्यातील एकाही कार्यकर्त्याला याचा त्रास झाल्यास याद राखा, असा सज्जड दमच निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांना दिला आहे.


महत्वाच्या बातम्या:


माढ्यात 60 टक्के मतदान, निंबाळकरांना साताऱ्यात, मोहिते पाटलांना माळशिरमध्ये लीड मिळण्याची शक्यता, मात्र, 'जरांगे इफेक्ट'मुळे धाकधूक