Pandharpur News : विठ्ठल मंदिरात (Vitthal Mandir) भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी 32 वर्षांपूर्वी बांधलेला सात मजली दर्शन मंडप आता जमीनदोस्त करण्याचा प्रस्ताव पंढरपूर (Pandharpur) विकास आराखड्यामध्ये आल्यानंतर आता यास मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी विरोध दर्शवला आहे. भाविकांच्या देणगीच्या पैशांतून 32 वर्षांपूर्वी हा सात माजली दर्शन मंडप उभारला होता. खरेतर या दर्शन मंडपाचे सात मजले चढ-उतार करणे ही वृद्ध भाविकांसाठी एक शिक्षाच ठरत होती. अलिकडच्या काही वर्षात या दर्शन मंडपाचा फक्त पहिला मजला भाविकांच्या रांगेसाठी वापरात होता. त्यामुळे तसा या इमारतीचा कोणताच उपयोग होत नसल्याने या ठिकाणी नवीन इमारत उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने केला आहे. 


याच इमारतीमध्ये बदल करावेत, मात्र जमीनदोस्त करु नये : गहिनीनाथ महाराज औसेकर
आता ही इमारत पाडण्यास मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी स्पष्ट शब्दात विरोध केला असून याबाबत आमच्याशी कोणीच बोलणे केले नसल्याचे त्यांनी सांगितले. भाविकांच्या पैशातून उभारलेल्या या इमारतीमध्ये सध्याच्या प्रकल्पानुसार बदल करुन हीच इमारत वापरात आणावी अशी मागणी औसेकर यांनी केली आहे. याच इमारतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन जे बदल करायचे असतील ते करावेत, मात्र ही इमारत जमीनदोस्त करु नये अशी भूमिका औसेकर यांनी मांडली आहे. 


32 वर्षांपूर्वी बांधलेला सात मजली दर्शन मंडप हा भाविकांसाठी शिक्षाच होता. वृद्ध भाविकांना देवाच्या दर्शनासाठी सात मजले चढून सात मजले उतरावे लागत होते. याबाबत एबीपी माझाने वारंवार भाविकांचे हाल समोर आणल्यावर काही वर्षांपासून याचा वापर बंद झाला होता. आता हा सात मजली दर्शन मंडप पाडण्याचा प्रस्ताव या आराखड्यात घेतला. ही तेवढी जमेची बाजू असली तरी या आराखड्यात विठ्ठल भक्तांच्या दर्शन व्यवस्थेबाबत कोणताच समाधानकारक पर्याय समोर आला नसल्याने भाविकांना पुन्हा तासनतास दर्शन रांगेत तिष्ठत थांबावे लागणार आहे.


आधीच शासनाच्या प्रस्तावित विकास आराखड्यास सर्वच बाजूने टोकाचा विरोध होत असताना आता मंदिर समितीच्या अध्यक्षांनी देखील सात मजली दर्शन मंडप पाडण्यास विरोध केल्याने शासनाला या विकास आराखड्याबाबत पुनर्विचार करावा लागणार आहे. 


नवीन विकास आराखड्यात नेमके काय अंतर्भूत?
* शहरातील 24 रस्त्यांचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण केले जाणार असून याचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे 
* जुना सात मजली दर्शन मंडप पाडणे 
* भाविकांच्या निवासासाठी 65 एकरप्रमाणे तेवढाच नवीन तळ उभारणे 
* चंद्रभागेच्या दोन्ही तीरावर नवीन घाट बांधणे 
* संतवाणी नावाचे नवीन रेडिओ स्टेशन उभारणे 
* पंढरपूर येथे कायमस्वरुपी हेलिपॅड उभारणे 
* यमाई तलाव आणि शहरातील दोन उद्यानांचे सुशोभीकरण करणे 
* पंढरपूर येथे नवीन संत नामदेव स्मारक उभारणे
* मंगळवेढा येथे संत चोखामेळा स्मारक उभारणे 
* माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी तळासाठी भूसंपादन करुन विकास करणे
* यात्राकाळात गर्दी विकेंद्रीकरण करण्यासाठी शेगाव दुमाला परिसर विकास करणे 
* गोपाळपूर परिसर आणि गोपाळकृष्ण मंदिराचा विकास करणे 


अशी होईल निधी तरतूद 
* विठ्ठल मंदिर आणि परिसर विकास - 155 कोटी रुपये   
* पंढरपूरमधील पायाभूत सुविधा - 1330 कोटी रुपये 
* पालखी भूसंपादन विकास कामे - 224 कोटी रुपये 
* वारकरी संप्रदाय प्रचार आणि प्रसिद्धी - 220 कोटी रुपये 
* प्रशासकीय खर्च - 78 कोटी रुपये 


आराखडा मंजूर झाल्यास असा होईल खर्च 
2022-23 - 166 कोटी रुपये 
2023-24 - 500 कोटी रुपये 
2024-25 - 500 कोटी रुपये 
2024-25- 500 कोटी रुपये