Sadabhau Khot : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून सदाभाऊ खोत यांनी खोचक टोला लगावला आहे. रामाकडे जावा नाही, तर काशीत अंघोळ करा, राज्यातील जनतेच्या मनातून तुम्ही संपला आहात असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी शिवसेनेला लगावला. 

  
सदाभाऊ खोत यांनी सोलापुरात बोलताना महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, सरकारने जनतेच्या प्रश्नावर बोलायला पाहिजे, पण मुख्यमंत्री घरात बसतात आणि युवराज देश वाऱ्या करत असतात. आज ते अयोध्येच्या स्वारीवर गेले आहेत. ज्यांनी अयोध्येच्या मंदिराच्या वर्गणीमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले आणि गोंधळ घातला, ज्यांनी राम मंदिर बांधायची यांच्यात हिम्मत नाही असे म्हणाले तेच आता आयोध्येला निघाले आहेत.  


रामाचाही जप करायचा आहे आणि कॉंग्रेस वगैरे आहेत त्यांना हिरवे झेंडे खांद्यावर घेऊन नाचायचे आहेत. एका म्यानात दोन तलवारी राहतील कश्या? आता त्या राहू शकत नाहीत. मग तुम्ही रामाला जावा नाहीतर काशीला जाऊन आंघोळ करा. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातून तुम्ही संपलेले आहात, असा टोला लगावला.


शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा महाराष्ट्राचा अपमान नाही का ?  


काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू न दिल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली होती. या टीकेचाही सदाभाऊ खोत यांनी समाचार घेतला. त्यांनी सांगितले की, मला या लोकांचे हसू येते, काही घडले की महाराष्ट्राचा अपमान होतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताहेत हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? तुमची संपत्ती, तुमचा सातबारा महाराष्ट्राच्या नावावर करा बघू तुमची दानत आहे का ? मला वाटते महाराष्ट्राचा बिलकूल अपमान झालेला नाही. सुप्रिया ताईंनी तो शपथविधी आठवावा मग त्यांच्या लक्षात येईल की प्रोटोकॉलप्रमाणे झाले की नाही ? प्रोटोकॉलप्रमाणे आधी मुख्यमंत्री बोलतात आणि मग उपमुख्यमंत्री त्यात वावगं काय? असा कुत्सित टोला लगावला. 


संजय राऊत शरद पवारांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करा, एवढंच म्हणायचे राहिल आहेत


सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार करण्यावरूनही भाष्य केले. संजय राऊतांचे अभिनंदन करेन की ते असं म्हणाले नाहीत, की शरद पवारांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करा. एवढेच म्हणायचे राहिलेत, पण पवार साहेबांनी सांगितले की मी उमेदवार नाही. संजय राऊतांचे म्हणणे म्हणजे शिळ्या कडीला ऊत आणण्यासारखे आहे. सकाळी सकाळी नाष्टा झाला की संजय राऊताचे तोंड बघायला लागते. संजय राऊतांचे तोंड बघितलं, की दिवसभर काम होईना असं झालं आहे आणि सरकारला वेळ नाही. त्यामुळे या विनोदवीरांनी जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या बांधावर गेले पाहिजे, असे सदाभाऊ खोत म्हणाले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या