रत्नागिरी : उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आज शाळेची पहिली घंटा वाजली. आजपासून राज्यातील सगळ्या एसएससी बोर्डाच्या शाळा सुरु झाल्या आहेत. राज्यातील अनेक शाळांमध्ये फुलं आणि फुग्यांच्या सजावटीने तसंच लेझीम, ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. परंतु रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील रायपाटण गावातील विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस फारसा चांगला नव्हता. शाळेच्या पहिल्याच दिवशी जमीन मालकाने विद्यार्थ्यांचा मार्ग अडवून धरला. शाळेच्या जमिनीवर जमीन मालकाने दावा केल्याने विद्यार्थ्यांना भरपावसात शाळेबाहेरचं उभे राहावं लागलं.
राजापूर तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या रायपाटण गावात हा प्रकार घडला आहे. जिल्हा परिषदेची शाळा माझ्या जागेत आहे. मी कुणाला जाऊ देणार नाही, असं म्हणत संबंधित जमीन मालकाने कुंपण देखील घातलं आहे. शाळेच्या जमिनीवर जमीन मालकाने दावा केल्याने विदयार्थी भर पावसात शाळेबाहेर उभं राहावं लागलं आहे. शाळेच्या नूतनीकरणाबाबत याच मालकाने आडकाठी केल्याने 2019 पासून हे प्रकरण दिवाणी न्यायालयात गेलं आहे. पण असं असलं तरी शाळेच्या इमारतीचा सात बारा जिल्हा परिषदेच्या नावावर आहे, अशी माहिती तंटामुक्ती अध्यक्षाने दिली आहे. या सगळ्या गोंधळात गटशिक्षण आणि इतर अधिकारी गावात दाखल झाले आहेत.
राज्यातील शाळांची पहिली घंटा वाजली
दोन वर्ष ऑनलाईन शिक्षणाच्या गराड्यात अडकेलेले विद्यार्थी पहिल्यांदाच जून महिन्यात शाळेत आले. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता गेल्या दोन अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर ऑफलाईन शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. पहिली ते दहावीच्या शाळा आजपासून सुरु झाल्या. शाळा जरी 13 जून रोजी झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना 15 जून रोजी प्रत्यक्ष शाळेत बोलावलं जावं, असं शिक्षण विभागाच्या आदेशात म्हटलं होतं.
यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येत होतं. कोरोना आणि त्यानंतर लॉकडाऊन यांचा राज्यांतील शाळांवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अनेक ठिकाणी ऑनलाईन वर्ग भरवण्यात आले. पण दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना मात्र सोयी-सुविधांच्या अभावामुळे शाळेपासून दूर राहावं लागलं. सध्या राज्यात कोरोनाच्या सर्व निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे.
पुष्पवृष्टी करत विद्यार्थ्यांचं स्वागत
बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. प्रवेशद्वार फुगे, फुलांनी सजवलले होते. लेझीम, ढोलताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. विद्यार्थ्यांना वही पेन देण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साह दिसून येत होता. या चिमुकल्यांचे रडणे, शिक्षकांचं समजावणं, मुलांचा किलबिलाट यामुळे शाळा दोन वर्षांनंतर गजबजून गेल्याचं दिसून आलं.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI