Pandharpur: भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक भाजपच्या दोन बड्या नेत्यांमध्ये रंगली असून सभेतील वक्तव्यामुळे आता भाजप नेत्यांतील वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. भीमा कारखान्याची सत्ता गेले 10 वर्षे कोल्हापूरचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे आहे. सध्या या कारखान्याची निवडणूक भलतीच रंगात आली असून खासदार महाडिक यांच्या सोबत राष्ट्रवादीचे उमेश पाटील, भगीरथ भालके, काँग्रेसचे पदाधिकारी, एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील उतरल्याने महाडिकांची बाजू भक्कम दिसत आहे.
 
महाडिकांच्या विरोधात राष्ट्रवादीचे राजन पाटील यांच्या मदतीला पुन्हा एकदा भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा गट उतरल्याने निवडणूक बोचऱ्या वक्तव्याने गाजू लागली आहे. उमेश परिचारक यांनी आपल्या सभेत बोलताना महाडिकांना उद्देशून तुमच्या आई-वडिलनाचे जसे संस्कार केले, तसा तुम्ही प्रचार करणार, असा जिव्हारी लागणार टोला लगावला होता. याला कारण ठरले होते स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांचे निवडणूक प्रचारात बाहेर आलेले व्यंगचित्र. यामुळे दुखावलेल्या उमेश परिचारक यांनी भाषणाच्या ओघात महाडिक गटाने पूर्वी सुधाकर परिचारक यांचेवर भ्याड हल्ला केला, गावडेंचा खून केला असे अनेक दुष्कृत्य महाडिक गटाने केल्याचा आरोप केला. 


याला लगेचच उत्तर देतांना खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्या देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबावर घाणेरडे वक्तव्य करणाऱ्या अवलादींनी आम्हाला संस्कार शिकाऊ नयेत, असे उत्तर दिल्याने सहकारातील या लढाईत आता भाजप खासदार धनंजय महाडिक विरुद्ध भाजप माजी आमदार प्रशांत परिचारक असा संघर्ष चिघळू लागला आहे. सध्या भाजपमध्ये आलेले माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे हे देखील महाडिकांच्या स्टेजवरून राजन पाटील आणि प्रशांत परिचारक यांच्यावर बोचरी टीका करीत आहेत. सभांतून सुरु झालेल्या या वैयक्तिक आरोप प्रत्यारोपामुळे मात्र निवडणुकीचे वातावरण खराब होऊ लागले आहे. कारखान्यातील सभासदांना केवळ चोख वजन काटा आणि एफआरपी नुसार चोख भाव एवढीच अपेक्षा असताना संपूर्ण निवडणूक वेगळ्याच वाटेल भरकटवण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचे धनंजय महाडिक यांनी आरोप केला आहे. महाडिक यांनी आपल्या काट्यात 1 किलोचा फरक पडला तर 1 लाखाचे बक्षीस जाहीर केले असून उसाला 2600 रुपयांचा दर जाहीर केला आहे. भीमा कारखान्यासाठी 13 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून 14 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Ahmednagar: अहमदनगरच्या अकोले तालुक्यात धावतायत अवघ्या 38 एसटी, पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या गावाला फटका