Ashadhi Wari Latest News : आषाढी एकादशीला येणाऱ्या लाखो भाविकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने खुशखबर दिली आहे. आषाढी एकादशीला पहाटे होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेनंतर कोणत्याही व्हीआयपीला दर्शन दिले जाणार नाही असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.
आषाढी एकादशी हा सोहळ्यातील पर्वणीच दिवस असतो. यादिवशी दर्शन मिळावे यासाठी 30-30 तास भाविक दर्शन रांगेत उभारलेले असतात. त्याचवेळी राज्यभरातील आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते व्हीआयपी बनून दर्शन घेण्यासाठी गर्दी करीत असतात. त्यामुळे रांगेतील शेकडो भाविकांना या पवित्र दिवशी दर्शनापासून मुकावे लागते. याबाबत मुख्यमंत्री शिंदे सरकारने एक धाडसी निर्णय घेत आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेनंतर कोणत्याही व्हीआयपीला दर्शनाला सोडले जाणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.
राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा निर्णय जाहीर केल्याने आषाढी एकादशीला केवळ दर्शन रांगेतील भाविकांनाच देवाचे दर्शन घेता येणार आहे. याचसोबत आषाढी एकादशीला मानाच्या दिंड्यांचे देण्यात येणाऱ्या दर्शन पासेसशिवाय कोणतेही व्हीआयपी दर्शन पासेस वितरित करू दिले जाणार नसल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले आहे. यामुळे दर्शन रांगेत उभ्या राहणाऱ्या भाविकांना पहाटेची शासकीय महापूजा संपल्यानंतर दिवसभर विठुरायाचे दर्शन पर्वणी काळात घेता येणार आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयाचे वारकरी संप्रदायातून जोरदार स्वागत होत आहे. आषाढी यात्रेला आलेल्या जास्तीत जास्त भाविकांना एकादशी दिवशी दर्शन देण्यासाठी झालेला हा निर्णय यात्रेच्या इतिहासात पहिल्यांदाच घेण्यात आला आहे. यामुळे एकादशी दिवशी दिवसभर दर्शनासाठी घुसखोरी करणाऱ्या तथाकथित राजकारण्यांना मात्र चांगलाच चाप बसणार आहे. आषाढी एकादशीला व्हीआयपी बंदीची संपूर्ण व्यवस्था पोलिसांच्या ताब्यात दिली जाणार असल्याने मंदिर प्रशासन देखील यात हस्तक्षेप करू शकणार नाही.
आषाढीला येणाऱ्या 20 लाख वारकऱ्यांची होणार आरोग्य तपासणी
यावर्षी आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची मोफत आरोग्य तपासणी करून अषधोपचार करण्याची अभिनव योजना राज्यसरकारकडून राबवली जाणार आहे. गेल्यावर्षी आषाढी यात्रेच्या तोंडावर राज्यात शिंदे सरकार आल्याने भाविकांसाठी खास काही करता आले नव्हते. त्यामुळे यावर्षी आरोग्याची वारी पंढरीच्या दारी याप्रमाणे जवळपास 20 लाख वारकऱ्यांचे शहरातील तीन ठिकाणी मेगा आरोग्य कॅम्प घेतले जाणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले . राज्यातून येणाऱ्या जवळपास 450 पायी दिंडी सोहळ्यात देखील आरोग्य तपासणी होणार असून पंढरपूर मधील गोपाळपूर , वाखरी आणि सोलापूर रोड या तीन ठिकाणी हे मेगा कॅम्प घेतले जाणार आहेत .