Pandharpur Ashadhi Wari 2023: आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी देवाच्या चरणावर भरभरून दान दिले. भाविकांनी दिलेल्या या दानामुळे देवाची तिजोरी तुडुंब भरली. आषाढी  यात्राकाळात तब्बल 6 कोटी 27 लाख  रुपये एवढी रक्कम जमा झाली आहे. गेल्या वर्षीच्या आषाढी यात्रेच्या तुलनेत यंदा 57 लाख 63 हजार 725 रुपयाचे जादा दान देवाच्या खजिन्यात जमा झाले आहे.  


यावर्षी मंदिर समितीने प्रसादाचे बुंदी लाडू समितीकडून बनविले होते. या लाडू प्रसाद विक्रीतून मंदिर समितीला (Pandharpur Vitthal Mandir) जवळपास 75 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. मंदिराच्या भक्त निवासामधून 44 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. विठुरायाच्या पायावर 45 लाख 23 हजार तर रुक्मिणी मातेच्या पायावर 12 लाख 69 हजाराचे उत्पन्न जमा झाले आहे. 


देवाच्या हुंडीपेटीत तब्बल 1 कोटी 38 लाखांचे भरभरून दान भाविकांनी टाकले आहे. तर देणगी पावतीद्वारे 2 कोटी 13 लाखांचे दान मंदिराच्या खजिन्यात जमा झाले आहे. देवाला अर्पण झालेल्या सोने चांदीतून 30 लाख रुपये जमा झाले आहेत. गरिबांचा लोकदेव म्हणून ओळख असलेल्या विठुरायाच्या दर्शनासाठी यंदा विक्रमी गर्दी झाली होती. यंदाच्या आषाढी यात्रेला 12 लाखापेक्षा जास्त भाविक दाखल झाले होते . 


आषाढी पौर्णिमा झाल्यावर देवच्या हुंडीपेट्या, देणगी केंद्रे, लाडू विक्रीसह सर्व ठिकाणच्या रकमेची मोजदाद करणे सुरू होते. मंदिर समितीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 6 कोटी 27 लाख 60 हजार 227 रुपये एवढे उत्पन्न जमा झाले असून गेल्यावर्षीपेक्षा तब्बल 57 लाख 63 हजार 725 रुपयांनी देवाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.  


विठ्ठल भक्तांनी आषाढी यात्रेत लालपरीला दिलं 28 कोटींचं उत्पन्न


आषाढी यात्रा कालावधीत एसटी महामंडळाला (MSRTC) तब्बल 27 कोटी 88 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. आषाढी यात्रेत तब्बल 8 लाख 81 लाख वारकऱ्यांनी लालपरीतून प्रवास केला असून सोलापूर विभागाला 48 लाख 80 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या आषाढी यात्रेत सुमारे 5 हजार बसेसचे नियोजन महामंडळाने केले होते. आषाढी सुरु झाल्यापासून म्हणजे 25 जून ते 3 जुलै या कालावधीत राज्याच्या विविध भागातून 17 हजार 500 फेऱ्या करुन आणि 47050 किलोमीटर प्रवास करत लालपरीने 8 लाख 81 हजार वारकऱ्यांची वाहतूक केली होती. 


महिला प्रवाशांची संख्या वाढली


महिलांना निम्मी भाडे सवलतींमुळे जवळपास 30 टक्के वारकऱ्यांची संख्या विशेषतः महिला प्रवाशांची संख्या वाढल्याने महामंडळाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी महामंडळाने 6 लाख 35 हजार वारकऱ्यांची वाहतूक केली होती. यंदा प्रवासी भारमानात तब्बल 2 लाख 77 हजार 500 प्रवाशांची संख्या वाढली आहे.