Sharad Pawar : शेतकऱ्यांच्या (Farmers) नावावर कर्ज उचलणाऱ्यांची, तसेच दबाव टाकणाऱ्यांची कागदपत्रं मला द्या, त्यांचा बंदोबस्त मी करतो असा इशारा राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला. राजकीय नेत्यांकडून जर शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल तर त्यांना नेता म्हणून घेण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे शरद पवार म्हणाले. अनेक कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज उचलण्याचे प्रकार घडले आहेत. याबाबतच मुद्दा संजय पाटील घाटणेकर यांनी उपस्थित केला होता. यावर बोलताना शरद पवार यांनी कारखानदारांना थेट इशारा दिला. माढा (Madha) तालुक्यातील कापसेवाडीत कृषी निष्ठ परिवाराचे प्रमुख नितीन कापसे यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यासाठी शरद पवार आले होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.
साखर कारखानदारांनी काढली शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नावावर अनेक साखर कारखान्यांनी कर्ज काढल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळं शेतकरी चिंतेत आहे. कोणत्याही प्रकारची विचारपूस न करता ही कर्ज काढण्यात आल्याचा मुद्दा संजय पाटील घाटणेकर यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या या मुद्यावर बोलताना शरद पवार यांनी माढा तालुक्यातील साखर कारखानदारांनी इशारा दिला. शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढणाऱ्या नेत्यांची यादी मला द्या, त्याचा मी बंदोबस्त करतो असे शरद पवार म्हणाले. मात्र, शरद पवारांचा रोख नेमका कणाकडं? याची राजकीय वर्तुळात चर्चा सरु झाली आहे.
दबाव संपवण्याचा विचार आम्ही करु
अलिकडच्या काळात काही राजकारणी त्यांच्या मनासारखे काम केलं नाही की दबाव आणतात. आज चांगलं काम करणाऱ्याला, त्या कामापासून वेगळं करण्याचे प्रयत्न होत आहेत. शेतकऱ्यांसाठी जे काम करतायेत त्यांच्यावर जर दबाव आणण्याचे काम करत असेल तर तो दबाव संपवण्याचा विचार आम्ही करु, तुम्ही त्याचा विचार करु नका असा इशाराही शरद पवार यांनी दिला. दुधाचा व्यवसाय असेल, द्राक्षाची शेती असेल किंवा डाळिंबाची शेती असेल या सगळ्या गोष्टीत शेतकरी चांगले कष्ट करत आहेत. शेतीच्या प्रश्नावर आपण बसून चर्चा करु असे शरद पवार म्हणाले.
आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे कार्यक्रमाला उपस्थित
अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर माढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार बबनदादा शिंदे हे अजित पवार गटात सामील झाले आहेत. त्यानंतर प्रथमच शरद पवार हे माढा तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात आमदार बबनदादा शिंदे हे उपस्थित नव्हते, मात्र, त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या: