ABP Majha Impact News : ग्रामीण भागात अनेक गुणी कलाकारांची खाण आहे. कोणाचं खेळात प्राविण्य आहे, कोणाचं गाण्यात तर कोणाचं बोलण्यात आहे. असंच एक वेगळं प्राविण्य असणाऱ्या एका मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. संध्या शिवाजी शिरसट असं या मुलीचं नाव आहे. ती सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील केवड गावातील भैरवनाथ प्रशालेत इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.  26 जानेवारीला संध्याने 'दिल दिया है जान भी देंगे,' हे गाणं गायलं होतं. या गाण्याचा 2 मिनीटांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओनं अनेकांच्या मनाला भुरळ घातली आहे. हा व्हिडीओ संध्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरणार आहे. कारण, या व्हिडीओची राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागानं दखल घेतली आहे. तिला आगामी चित्रपटांमध्ये गाणं गाण्याची संधी मिळणार आहे. 


26 जानेवारीला संध्या शिरसटने 'दिल दिया है जान भी देंगे', हे गाणं गायलं होतं. या गाण्याचा 2 मिनीटांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिच्या आवाजात किती मोठी ताकद आहे हे यावरुन समजते. अत्यंत गरीब कुटुंबात असलेल्या संध्याच्या या गाण्याची दखल राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागानं घेतली आहे. आगामी चित्रपटात संध्याला गाण्याची संधी देणार असल्याची माहिती राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग प्रदेशाध्यक्ष तसेच मराठी चित्रपट असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. 



माझा इम्पॅक्ट : दिल दिया है जान भी देंगे, माढ्याच्या मुलीने 26 जानेवारीला गाणं गायलं, माझाचा व्हिडीओ पाहून 3 सिनेमांच्या ऑफर!


Sandhya Shirsat


'एबीपी माझाने' प्रथम हा व्हिडीओ केला होता प्रसारीत 


ग्रामीण भागात अनेक दर्जेदार कलाकार आहे. पक्त या कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळत नसल्यानं ते मागे पडतात. त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळाला तर हे कलाकार आपल्या गावाचं तालुक्याचं, जिल्ह्याचं, राज्याचं आणि देशाचं नाव मोठं करतील. संध्यानं गायलेल्या गाण्याला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या व्हिडीओची दखल घेत' एबीपी माझाने' प्रथम हा व्हिडीओ प्रसारीत केला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा व्हिडीओ पोहोचला होता. याच व्हिडीओची दखल राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागानं घेतली आहे. या विभागाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी आगामी मराठी चित्रपटात संध्याला गाणं गाण्याची संधी देणार असल्याची माहिती दिली आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शकांची बोलणं झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. 


'या' चित्रपटात संध्याला मिळणार गाण्याची संधी


आगामी काळात तीन ते चार नवीन मराठी चित्रपट येत आहेत. या नवीन चित्रपटात संध्याला गाणं गाण्याची संधी देणार असल्याची माहिती बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. आगामी काळात 'लगोरी-द गेम' हा महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांच्या विषयावर आधारित चित्रपट येणार आहे.  या चित्रपटाच्या निर्मात्या या शालिनी सुनील शिरसाट, तर दिग्दर्शक हे महेंद्र बोरकर आणि त्याचे लेखक किशोर बळी आहेत. तर 'लाडकी बहीण' या चित्रपटाचे  लेखक दिग्दर्शक हे गणेश शिंदे आहेत, तर निर्माते हे प्रशांत कबाडे आहेत. त्याचबरोबर 'हंडा' हा देखील मराठी चित्रपट येत आहे. या चित्रपटात गाण्याची संधी संध्या शिरसटला मिळणार आहे.  रेवकांता फिल्मतर्फे देखील एक नीव चित्रपट येणार असल्याची माहिती बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. यामध्ये देखील संध्याला संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.


शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं : बाबासाहेब पाटील


संध्या शिवाजी शिरसट या मुलीनं अत्यंत सुंदर असं गाणं गायल आहे. सुंदर आवाजात तिने गाण्याचे सादरीकरण केलं असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिली. संध्याचा आवाज अनेक दिग्दर्शकांना निर्मात्यांना आवडला आहे. त्यामुळं आम्ही आगामी तीन ते चार मराठी चित्रपटात तिला संधी देणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. एबीपी माझाने हा व्हिडीओ प्रसारीत केल्याबद्दल बाबासाहेब पाटील यांनी आभार मानले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे आपण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यांना विविध क्षेत्रात संधी मिळाली पाहिजे असे बाबासाहेब पाटील म्हणाले. पुढच्या महिन्यात या चित्रपटांचं शुटींह सुरु होणार आहे, यामध्ये तिला गाण्याची संधी देणार असल्याची पाटील म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


Marathi Song : लयभारी दिसते पोर! आणखी एका मराठमोळ्या रोमँटिक गाण्याचीच हवा, सोशल मीडियावर तुफान व्हायरल