Aashadhi Wari 2026 : अवघ्या दोनच दिवसावर आषाढी एकादशी सोहळा आला आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपुरात मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले आहेत. आषाढी वारीसाठी अजून दोन दिवसांचा कालावधी असताना आज नवमीलाच विठ्ठलाच्या दर्शनाची रांग मंदिरापासून आठ किलोमीटर लांब गेली आहे. अजूनही हजारोंच्या संख्येने भाविक दर्शन रांगेकडे येत आहेत. मोठमोठे वीस दर्शन मंडप भरूनही आठ किलोमीटरची रांग आत्ताच गेली असून गेल्यावेळी पेक्षा तीन पट लांब दर्शन रांग बनविली असली तरी अजूनही मोठी रांग बनवायची वेळ प्रशासनावर येणार आहे.

Continues below advertisement

काल रात्री भाविकांची गर्दी वाढत गेल्यावर पुन्हा तीन किलोमीटरची दर्शन रांग उभा करण्यात आली पण आत्ता त्याच्याही पुढे भाविक रांगेत उभारल्याने आता अजून लांब दर्शन रांग बनवायचे काम सुरू झालेले आहे. यावर्षी आधी भाविक रांगेत उभारतात आणि नंतर पुढे दर्शन रांगेची लांबी वाढवायची वेळ प्रशासनावर येत आहे. खऱ्या अर्थाने विठ्ठलाची लांबच लांब रांग आज पाहायला मिळत आहे.

आषाढी एकादशी यंदा 25 जुलै रोजी, मंदिर समितीकडून तब्बल 12 लाख बुंदी लाडू 

आषाढी एकादशी यंदा 25 जुलै रोजी आहे. यानिमित्त पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी, भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात, या काळात पायी चालत वारी करण्याची परंपरा आहे, अशात या एकादशीनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर आहे, यात्रा काळात प्रसादासाठी मंदिर समितीकडून तब्बल 12 लाख बुंदी लाडू बनविण्यात आले आहेत, गरजेनुसार ही संख्या अजून वाढविण्यात येणार असल्याचं मंदिर समितीकडून सांगण्यात आले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या राज्यात अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई सुरू असताना, मंदिर प्रशासनाने लाडू बनविण्याचे साहित्य आणि बनविलेले लाडू या दोन्हीची तपासणी अन्न व औषध प्रशासनाकडून करून घेतली आहे. 

Continues below advertisement

वारकऱ्यांसाठी विविध सुविधा

सध्या संपूर्ण पालखी मार्गावर उभारण्यात आलेले हे विशाल जर्मन हँगर मंडप वारकऱ्यांचे विसाव्याचे ठिकाण बनत आहे. या केंद्रांमध्ये वारकऱ्यांना विसाव्या सोबत स्वच्छतागृहे आरोग्य सुविधा, पायाचे मसाज, शुद्ध पाणी याची सोय केली असून याच ठिकाणी रात्री या वारकऱ्यांना भजन कीर्तन करण्यासाठी देखील स्टेज आणि इतर सुविधा करण्यात आल्याचे गोरे यांनी सांगितले आहे. पालकमंत्र्यांच्या माहितीनुसार, या मुख्यमंत्री सहाय्यता केंद्रात महिलांसाठी ही वेगळी व्यवस्था केली असून महिलांसाठी वेगळे स्नानगृहे, चेंजिंग रूम हिरकणी कक्ष उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यंदा सर्व सुविधा दुपटीने वाढविण्यात आल्याने पंढरपूर कडे येणाऱ्या सर्व पालखी मार्गांवर मुख्यमंत्री सहाय्यता केंद्र हे वारकऱ्यांचे पसंतीस उतरत असून दिवसभर प्रवास करून थकलेले वारकरी येथे विश्रांती घेतात आणि दुसऱ्या दिवशी नव्या दमाने पुन्हा पुढची वाट चालतात असे गोरे यांनी सांगितले आहे. पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांच्या होत्या त्याचे तंतोतंत पालन केले असे गोरे यांनी सांगितले आहे.