रत्नागिरी : राज्याच्या विधानसभेचे बिगुल आता लवकरच वाजणार आहे. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी दावा केला आहे. तर भाजपकडून माजी खासदार निलेश राणे यांनी देखील उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे यंदा वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे असा सामना कुडाळ मालवण मतदारसंघात रंगण्याची शक्यता आहे. 


आमदार वैभव नाईक हे आता चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीत उतरणार आहेत. एक वेळा त्यांचा पराभव झाला आहे. विद्यमान खासदार नारायण राणे यांचा त्यांनी पराभव करून 2014 ला राज्यात जायंट किलर म्हणून समोर आले. 2009 साली वैभव नाईक पहिल्या वेळी नारायण राणे यांच्यासमोर पराभूत झाले. तर 2014, 2019 असे दोन वेळा निवडून आले आहेत. आता ते पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. 


दुसरीकडे माजी खासदार निलेश राणे देखील कुडाळ मालवण विधानसभा निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी तशी इच्छा पक्षाकडे व्यक्त केली आहे.


40 हजारांचं मताधिक्य घेणार, निलेश राणेंचा विश्वास 


गेल्या तीन वर्षांपासून कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात माजी खासदार निलेश राणे निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यामुळे त्यांनी या मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. निलेश राणे यावर बोलताना म्हणाले की, पूर्वीपासून नारायण राणेंचा हा मतदारसंघ आहे. मागील 10 वर्षे आमच्याकडून गेला होता. मात्र लोकसभेला या मतदारसंघातून 27 हजारांचे मताधिक्य मिळवलं आहे. आता आम्ही 40 हजार मताधिक्य मिळवण्याचं उद्दीष्ट ठेवलं आहे. जमिनीवर काम करून कार्यकर्त्यांच्या विश्वासावर हा मतदारसंघ परत आमच्याकडे घेणार आहोत. 


शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक म्हणाले की, कुडाळ मालवण मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलो आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हाला पुन्हा काम करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार काम करायला सुरवात केली आहे. महविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर उमेदवारी जाहीर केली जाणार आहे. सध्या तरी मी मतदारसंघात जोरदार काम करत असून उद्धव ठाकरे माझी उमेदवारी जाहीर करतील.


माजी खासदार निलेश राणे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. लोकसभेच्या निवडणुकीत खासदार नारायण राणे यांना कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात 27 हजारांच मताधिक्य मिळाले. यावर आता महायुतीची पुढील गणित माडली जात आहेत.


गेल्या दोन वेळा निवडून आलेले आमदार वैभव नाईक देखील मतदारसंघात फिरत असून आपल्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यात निलेश राणे आणि वैभव नाईक यांच्यात कोण बाजी मारणार हे पाहावं लागणार आहे.   


ही बातमी वाचा: