सिंधुदुर्ग: मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर बुधवारी या किल्ल्यावर जोरदार राजकीय राडा पाहायला मिळाला. या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर आले होते. यामध्ये आदित्य ठाकरे, जयंत पाटील आणि विजय वडेट्टीवार यांचा समावेश होता. नेमक्या याचवेळी तिथे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणे हेदेखील आपल्या समर्थकांसह पोहोचले. सुरुवातील नारायण राणे हे विजय वडेट्टीवारांना हस्तांदोलन करुन किल्ल्यात गेले.  मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्यात प्रवेश करताच नारायण राणे, निलेश राणे आणि त्यांचे समर्थक अचानक आक्रमक झाले. आम्ही स्थानिक लोक आहोत, म्हणून इकडे आलो आहोत. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली असताना हे बाहेरचे लोक इकडे कशाला आले? त्यांना आधी बाहेर काढा, अशी मागणी करत नारायण राणे प्रचंड आक्रमक झाले. यानंतर नारायण राणे समर्थकांनी ठाकरे गटाला आव्हान द्यायला सुरुवात केली. त्यावेळी ठाकरे गटाच आमदार वैभव नाईक आणि त्यांचे समर्थकही आक्रमक झाले आणि याचे पर्यवसन जोरदार राड्यात झाले.


राणे समर्थकांनी आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना किल्ल्यावर जाऊन देणार नाही, असा पवित्रा घेतला होता. पण आदित्य ठाकरे आणि वैभव नाईक किल्ल्यावरील एका पायरीवर ठाण मांडून बसले. यावेळी नितेश राणे आणि त्यांचे समर्थक ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आव्हान देत होते. त्यावेळी वैभव नाईक यांनी 15 मिनिटांत आम्हाला रस्ता खाली करुन दिला नाही तर आम्ही आमची ताकद दाखवून देऊ. आम्ही आतमध्ये घुसू, असे म्हटले. यावर राणे समर्थनक आणखीनच संतापले आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.


काही बालबुद्धीवाले नेते इकडे आले होते, उंची इतकीच त्यांची बुद्धी आहे. त्यांना वाटत असेल, पण आम्ही कोंबड्या वगैरे आणल्या नाहीत, असे आदित्य ठाकरे यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे राणे समर्थक आणखीनच चवताळले. यानंतर त्यांनी राजकोट किल्ल्यात असलेल्या आदित्य ठाकरे यांना बाहेर पडू देणार नाही, अशी भूमिका घेतली.



आणखी वाचा


त्यांना वाटत असेल, पण आम्ही कोंबड्या वगैरे आणल्या नाहीत, राजकोट किल्ल्यावर राडा सुरु असताना आदित्य ठाकरेंचा बोचरा वार


काहीही करा, गोळ्या घाला, नारायण राणे बोलले; राजकोट किल्ल्यात ठाकरे-राणे समर्थक भिडले, Photo