मुंबई: सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मुद्द्यावरुन शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. दीपक केसरकर यांना बुटाने मारले पाहिजे. केसरकर हे अफजलनाखानाची औलाद आहेत. असली सडक्या विचाराची माणसं आमच्यातून निघून गेली, हे बरंच झालं, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 


यावेळी संजय राऊत यांनी सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या दुर्घटनेविषयी संताप व्यक्त केला. यावरुन त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. शिवाजी महाराजांचा पुतळा अशाप्रकारे कोसळणं हा महाराष्ट्रावर झालेला आघात आहे.  फक्त निषेध करून शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची फाईल बंद करता येणार नाही.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांनी म्हटले आहे की, हा पुतळा पडला असेल तर तो फक्त भ्रष्टाचारामुळे. पाण्यावर आणि शिखरावर अनेक पुतळे उभारण्यात आले आहेत. प्रतापगडावर ताशी 120 किमी वेगाने वारे वाहत आहेत, तो पुतळा उभा आहे ना. पण मालवण किल्ल्यावरील उभारलेला शिवरायांचा पुतळा अवघ्या सात महिन्यांत पडतो.  वाऱ्याने पुतळा पडला म्हणता मग आजूबाजूची झाड पडली नाही, लोकांच्या घरांवरील पत्रे उडाले नाहीत. तो पुतळा का पडला तर भ्रष्टाचारने पोखरलेला हा पुतळा उभारण्यात आला, त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाला आहे, असे राऊत यांनी म्हटले.


या पुतळ्यामागे ठाणे कनेक्शन आहे. एकनाथ शिंदे यांच्या पुत्राचं यामध्ये कनेक्शन आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या नेतृत्त्वाखाली एसआयटी स्थापन झाली पाहिजे. तसेच शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर सुरु झालेले आंदोलन संपणार नाही. मी 30 तारखेला तिकडे स्वत: जाणार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.


केसरकर आणि नारायण राणेंवर संजय राऊतांची टीका


नारायण राणे या माणसाला वेड लागले आहे. इमारती कोसळणे आणि पुतळा कोसळणे यामध्ये फरक आहे. राणे तुम्ही मराठी खासदार असून, असं बोलताय. शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याच्या कामात करोडोंचा भ्रष्टाचार झाला आहे. हा आरोप नाही तर हे सत्य आहे. देवेंद्र फडणवीस ही तुमची पापं आहेत. तुमच्या भाजपच्या लोकांमुळेच शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रात पराभव झाला, असेही संजय राऊत यांनी म्हटले.


छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे बरं झालं, त्यामधून काही चांगलं होईल, असे दीपक केसरकरांना वाटते. हे शब्द केसरकरांच्या तोंडातून कसे निघू शकतात. किती घाणेरड्या मनोवृत्तीचे लोक देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलेत. हे सगळे शिवाजी महाराजांचे का इतके शत्रू झालेत, हे माहिती नाही. हे देवेंद्र फडणवीस यांचं पाप आहे. मिंधे यांची टोळी पोसण्याचं काम फडणवीस आणि नरेंद्र मोदींनी केले. या सगळ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पैसे खाण्यासाठी पडला, अशी टीका संजय राऊत यांनी केली. 


दरम्यान, आज मालवणमध्ये महाविकास आघाडीने मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाला आदित्य ठाकरे, जयंत पाटील आणि विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार आहे. त्यासाठी मालवण बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मालवणमध्ये बाजारपेठेतील बहुतांश व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली आहेत. 



आणखी वाचा


छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे फरार, कल्याणमधील घराला टाळं