सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यातील सेतू केंद्र चालवण्याची जबाबदारी गुजराती कंपनी असलेल्या गुजरात इन्फोटेककडे देण्यात आली आहे. पुढील तीन वर्षांसाठी म्हणजे 2028 पर्यंत ही गुजराती कंपनी सेतू कार्यालय चालवणार आहे. एकीकडे उद्योगधंदे व्यवसाय गुजरातला जात असताना  कोकणातील सेतू सुविधा केंद्रसुद्धा गुजराती कंपनी चालवत असल्याने ठाकरेंच्या शिवसेनेने याला विरोध केला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून लवकरच आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शिवसेना नेते विनायक राऊत यांनी दिला.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सेतू सुविधा केंद्र चालवण्याची जबाबदारी गुजरातच्या गुजरात इन्फोटेक कंपनीकडे देण्यात आली आहे. 9 जानेवारी 2025 पासून ते 8 जानेवारी 2018 पर्यंत, म्हणजे पुढील तीन वर्षासाठीचे वर्क ऑर्डर गुजरात इन्फोटेक या गुजरातच्या कंपनीला देण्यात आली आहे. पण त्यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता असून ठाकरे गट आंदोलन करणार आहे.


गुजराती कंपन्यांची स्थानिक उद्योगांमध्ये घुसखोरी 


माजी खासदार आणि शिवसेना नेते विनायक राऊत म्हणाले की, आजपर्यंत या सरकारने महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला नेले. पण आता सिधुदुर्गमधील सगळे सेतू केंद्र गुजरातच्या कंपनीला चालवण्यासाठी दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने सिंधुदुर्गच्या स्थानिकांवर अन्याय केला आहे. सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी ही ऑर्डर काढली आहे. गुजराती कंपन्यांची आता स्थानिक उद्योगांमध्येही घुसखोरी सुरू आहे. त्याच्याविरोधात शिवसेना आंदोलन करणार आहे. 


Sindhudurg Setu Suvidha Kendra : कोणते सुविधा केंद्र गुजराती कंपनीकडे?


सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय, देवगड , वैभववाडी , कणकवली, मालवण , कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग या नऊ केंद्रांचा कारभार आता गुजराती कंपनीकडे असणार आहे. 


ही बातमी वाचा: