Sindhudurg News : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात होऊ घातलेल्या खनिज उत्खनन प्रकल्पाला (Mineral Mining Project) ग्रामस्थांकडून तीव्र विरोध केला जातो आहे. सावंतवाडी (Sawantwadi) तालुक्यातील आजगाव, मळेवाड, धाकोरा, आरवली, आसोली, सोंसुरे, आरवली बांध, साखेलखोल ग्रामपंचायत हद्दीत खनिज प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. हा प्रकल्प पर्यावरणाला हानी पोहोचवणारा असून यामुळे परिसरातील भातशेती, काजू बागायतीचा ऱ्हास तसंच हानी होईल, अशी भावना व्यक्त करत गावकऱ्यांनी याला तीव्र विरोध केला आहे. 


आजगाव ग्रामपंचायत हद्दीत 11.4 किलोमीटर क्षेत्रफळावर खनिज कंपनीचा प्रकल्प उभारण्यासाठी, सर्वेक्षणाचं काम करण्यासाठी आजगाव ग्रामसभेकडून एनओसी मागण्यात आली आहे. मात्र पूनर्वेक्षण करताना अनुदान क्षेत्रातील जमिनीचे तसेच परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. कारण संभाव्य खनिज क्षेत्रामध्ये ड्रिलिंग होणार असून भविष्यात याचे परिणाम धोकादायक असल्याचं सांगत ग्रामस्थांकडून विरोध केला जात आहे. प्रशासनाने ग्रामस्थांना विश्वासात न घेता जर संबंधित खनिज प्रकल्पाला मान्यता दिल्यास तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल. तसेच कोणत्याही परिस्थितीत पर्यावरणाचा ऱ्हास करणारा प्रकल्प होऊ देणार नाही. परिणामी आम्हाला आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.


जेएसडब्लू कंपनीने शिरोडा मळेवाड पंचक्रोशीतील 9  ग्रामपंचायतींना पत्र देऊन खनिज उत्खननाच्या चाचणीसाठी परवानगी मागितली आहे. मात्र सर्वच गावांकडून विरोध केला जात आहे. खनिज उत्खनन कोकणासाठी (Konkan) शाप आहे. यापुढे आजूबाजूला झालेले खनिज उत्खनन प्रकल्प हे विनाशकारी आहेत हे सिद्ध झाल आहे, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे. तळवणे, रेडी, कळणे या गावात झालेले हे प्रकल्प आणि त्यामुळे त्याठिकाणी होणारे आरोग्याचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याची टंचाई यामुळे या नऊ गावांचा विरोध आहे. प्रत्येक गावात ग्रामसभा घेऊन विरोध केला जात आहे. या प्रकल्पामुळे पर्यावणाचा ऱ्हास, नैसर्गिक साधनसंपत्ती नष्ट झाली. उभे डोंगर कापून कोकण कुरुप केलं जातं आहे, असंही गावकऱ्यांचं म्हणणं आहे. 


या नऊ गावात खनिज उत्खनन प्रकल्प आल्यास शेतकरी रसातळाला जाईल. या ठिकाणी नैसर्गिकरित्या आलेल्या सुरंगी झाड नष्ट होतील. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प होऊन शेतकऱ्यांचे हाल होतील. असे प्रकल्प गावात आल्यानंतर राजकारण केलं जातं. त्यामुळे ग्रामस्थांनी एकजुटीने लढून या प्रकल्पांना विरोध केला पाहिजे. हिरवेगार डोंगर हे आपल्या कोकणाची साधनसंपत्ती आहे. हेच डोंगर कापले गेले तर भविष्यात पावसावरही परिणाम होईल. ग्लोबल वार्मिंगचा परिणाम डोंगर कापल्याने होणार आहे, असं मळेगाव, कोंडुरे गावाचे उपसरपंच हेमंत मराठे यांनी म्हटलं. त्यामुळे हा लढा कोर्टापर्यत लढण्याची गावकऱ्यांची तयारी सुरु झाली आहे.