Sindhudurg News : महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीत वर्षा पर्यटन सुरळीत चालावे यासाठी शनिवारी, रविवारी या सुट्टीच्या दिवसांमध्ये पोलिसांचा जादा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच त्यांना त्रास होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून आवश्यक ती दक्षता घेतली जाणार आहे.
आंबोली पोलीस दूरक्षेत्र येथे पोलिसांची बैठक झाली. या बैठीकत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. 10 जुलै रोजी आंबोली च्या मुख्य धबधब्याजवळ सहा तास ट्रॅफिक जाम झाला होता. कोल्हापूर, बेळगाव आणि गोव्याहून आंबोलीच्या दिशेने येणाऱ्या पर्यटकांमुळे आणि नियोजनाअभावी मुख्य धबधब्याजवळ पर्यटकांनी गाड्या पार्क केल्यामुळे मुख्य धबधब्याच्या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. ही बाब लक्षात घेऊन आता प्रत्येक वीकेण्डला पोलिसांचा अधिक पोलीस बंदोबस्त असेल.
दोन दिवसांपूर्वी आंबोली घाटात बस चालकाला मारहाणीचा प्रकार घडला होता. त्यामुळेच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना पोलीस प्रशासन करत आहे. आंबोलीत वीकेण्डला होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन वाहने पार्क करण्यासाठी आंबोली येथील सात पर्यटन स्थळावर पार्किंगसाठी जागा लवकरच निश्चित केली जाईल. त्यानंतर वाहतुकीमध्ये सुसूत्रता आणण्यात येईल.
आंबोलीचा धबधबा प्रवाहित, पर्यटकांचा ओघ वाढला
कोकणातील वर्षा पर्यटनाचं मुख्य केंद्रबिंदू आणि महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीचा मुख्य धबधबा प्रवाहित झाला आहे. त्यामुळे वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी देशभरातील पर्यटकांचा ओघ आता आंबोलीत सुरु झाला आहे. जैवविविधतेने संपन्न असलेल्या आंबोलीत पावसाळ्यात एक आगळंवेगळं रुप पाहायला मिळतं. पावसाळ्यातील आंबोलीचं रुप हे डोळ्याचं पारणं फेडणारं असतं. वातावरणात कमालीचा गारवा, दाट धुके, पाऊस आणि फेसाळणारे धबधबे हे अचंबित करणारं रुप आपल्याला आंबोलीत पाहायला मिळतं. जेवढी आंबोली दिवसा मनमोहक आणि विस्मयकारी आले तेवढीच रात्री थक्क करणारी आहे. विविध प्रकारचे साप, बेडूक, खेकडे आणि प्राणी या आंबोलीच्या या जंगलात पहायला मिळतात. म्हणूनच देशभरातील पर्यटकांचं फेव्हरेट डेस्टिनेशन आंबोली आहे. दरवर्षी लाखो पर्यटक आंबोलीत हजेरी लावतात.