Sindhudurg Nitesh Rane Threatens Voters : "चुकून जरी माझ्या विचारांचा सरपंच आला नाही तर मी एकाही रुपयाचा निधी देणार नाही. आता तुम्ही ही धमकी समजा, काहीही समजा, आपलं कॅल्युकेशन स्पष्ट आहे," अशी थेट धमकी भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी कणकवली (Kankavali) मतदारसंघातील नांदगावमधील मतदारांना (Voters) दिली आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. यावेळी त्यांनी थेट आपल्या विचारांचा सरपंच (Sarpanch) आला नाही तर निधी येणार नाही, असं म्हटलं 


नितेश राणे काय म्हणाले?


चुकून जरी इथे माझ्या विचाराचा सरपंच आला नाही तर मी एकाही रुपयाचा निधी देणार नाही. एवढी काळजी मी निश्चितपणे घेईन. म्हणजे आता हे तुम्ही धमकी समजा, हे समजा, काहीही समजा. पण आपलं कॅल्क्युलेशन स्पष्ट आहे. म्हणून मतदान करताना एक लक्षात घ्या, कारण सगळा निधी आता माझ्या हातात आहे. जिल्हानियोजन निधी असो, ग्रामविकासचा निधी असो, 2515 चा निधी असो, केंद्र सरकारचा निधी असो. सत्ते असलेला मी आमदार आहे. पालकमंत्री असो, जिल्हाधिकारी असो, संबंधित कुठलाही मंत्री असो, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे कोणीही मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाहीत. हा विषय तुम्ही सरळ स्पष्ट समजून घ्या. जर नितेश राणेच्या विचारांचा सरपंच आला नाही तर इथे विकास होणार नाही, निधी येणार नाही हे सरळ स्पष्ट आहे.


इथली जनता नितेश राणेंचा माज उतरवेल : वैभव नाईक


राणेंना सत्तेचा माज असल्यामुळे अशी वक्तव्य करत आहेत. नारायण राणेंचा सुद्ध माज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने उतरला होता, तसाच सत्तेचा माज नितेश राणेंचा देखील जनता उतरवेल. त्यामुळे मतदारांनी अशा प्रवृत्तीच्या लोकांना निवडून देऊ नये, अशा शब्दात ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी नितेश राणेंवर टीका केली. खरंतर विकास ही प्रक्रिया असते. ही सत्ता कोर्टाच्या आदेशानुसार कधीही पडू शकते. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही. शिंदे फडणवीस यांचं सरकार येऊन सहा महिने झाले तरी नितेश राणे यांना मंत्रिपद मिळालेलं नाही. त्यांना ते मिळणार नाही. इथल्या जनतेला नम्र आवाहन आहे की, ज्याप्रकारे शिवसेनेच्या माध्यमातून विकास झाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनही सुद्धा होईल.


जनता चिडून उठेल : हसन मुश्रीफ


आपले शिवसेनेचे खासदार निधी देतील. आचारसंहितेचा भंग होणं न होणं भाग वेगळा. पण जनता चिडून उठेल. उमेदवाराला पराभूत करेल. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार त्यांना मदत करतील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ म्हणाले.


VIDEO : Nitesh Rane : माझ्या विचाराचा सरपंच आला नाही तर मी एकही रुपयाचा निधी देणार नाही,नितेश राणेंची धमकी