सिंधुदुर्ग: उद्धव ठाकरे शेतकऱ्यांकडे जाऊन त्यांची दिशाभूल करत आहेत, ते मंत्रालयात शेतकऱ्यांना भेटत तरी होते का? असा सवाल राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. अन्याय झाल्यामुळेच गजानन कीर्तिकर यांच्यासारखे ज्येष्ठ नेते पक्ष सोडून जातात असंही त्यांनी वक्तव्य केलं.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमधील खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित राहिले. यावेळी त्यांनी खरेदी विक्री संघासाठी मतदान केलं. मात्र हे मतदान शालेय शिक्षणमंत्री म्हणून नाही तर खरेदी विक्री संघाचा सद्स्य म्हणून केले. या मतदानानंतर भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचा विजय होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसेच जिंकून आल्यानंतर खरेदी-विक्री संघाचा कायापालट करणार असल्याची माहिती सुद्धा यावेळी त्यांनी दिली.
खासदार संजय राऊत यांनी बंडखोर केलेल्या आमदारांना निवडून येण्याचा आव्हान दिलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, "मी कुठल्याही पक्षात उभा राहिलो तरी निवडून येतो. पक्षाची मतं निश्चितपणे महत्त्वाची असतात. त्याहीपेक्षा आपण केलेलं कार्य महत्त्वाचं असतं. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मतदारसंघात ज्या ठिकाणी उमेदवार उभे राहिले ते पंधरा-वीस हजार मतं मिळायचे. मात्र तिथे उमेदवार चागला असल्याने त्या ठिकाणी जे निवडून आलेले आमदार आहेत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत. संजय राऊत कुठल्या बाजूने राहतात हा त्यांचा निर्णय आहे. मात्र आमच्यावर टीका केली तर आम्ही त्या टीकेला उत्तर देणार. उद्धव ठाकरे शेतकऱ्यांकडे जाऊन त्यांची दिशाभूल करत आहेत. ते मंत्रालयात शेतकऱ्यांना भेटत तरी होते का?"
संजय राऊत यांची त्यांच्या पक्षावर निष्ठा आहे, ती चांगली बाब आहे, परंतु त्यांनी जो काय आपला सकारात्मक दृष्टीकोन ठेवलेला आहे, तो तसाच ठेवावा. कारण ते उत्कृष्ट संपादक आहेत असं दीपक केसरकर म्हणाले. ते म्हणाले की, "पॉझिटिव्हली काम केलं तर ते राज्याला चांगल्यापैकी कॉन्ट्रीब्यूट करू शकतात, चांगले विचार देऊ शकतात, चांगल मार्गदर्शन करू शकतात आणि एक ज्येष्ठ म्हणून चांगलं काम करावं हीच आमची अपेक्षा आहे. आमच्या 50 आमदारांवर ज्या प्रकारे टीका केली, ते पाहता आम्ही मनामध्ये वैरभाव ठेवला पाहिजे होता. पण असा वैरभाव आमच्या एकाही आमदाराच्या मनामध्ये नाही. आम्ही ते विसरूनही गेलो आहोत. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चालत आहोत. म्हणूनच आमच्याकडे गजानन कीर्तिकर यांच्यासारखे जेष्ठ नेते आले. त्यांचं पक्षांमध्ये असलेलं योगदान लक्षात घ्या. त्यांची शिवसेनेमध्ये असलेली कारकीर्द लक्षात घ्या. असा ज्येष्ठ नेता असतो तो पक्षाच्या बाहेर जाणार नाही. खरोखर त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. त्यांच्या मतदारसंघातली काम होत नाही. त्यावेळेला अशी निर्णय घ्यायला लागतात."
बाळासाहेबांचे विचार आदित्य ठाकरे विसरल्याने ते भारत जोडो यात्रेत सहभागी झाले अशी टीका दिपक केसरकर यांनी केली आहे. ते म्हणाले की, "ज्यांच्यावर बाळासाहेबांनी अत्यंत कठोर शब्दात टीका केली, प्रसंगी पक्ष बंद करायला लागला तरी चालेल पण काँग्रेस सोबत जाणार नाही अशी बाळासाहेबांची भूमिका होती. त्यांचे नातू भारत जोडो यात्रेत सहभागी झाले याकडे शिवसैनिकांनी डोळसपणे बघितलं पाहिजे."