Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीतील (Vaibhavwadi) करुळ घाटात सूर्यास्त पॉईंटवरुन 700 फूट खोल दरीत कार कोसळली. दैव बलवत्तर म्हणून कारमधील दोघांचा जीव वाचला. कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. अपघातात गाडीतील दोन प्रवासी दरीत कोसळले. इथून जाणाऱ्या वाहनचालकांनी वैभववाडी पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर वैभववाडी पोलीस पथक आणि सह्याद्री जीवरक्षक टीम करुळ घाटात पोहोचली. पोलीस आणि सह्याद्री जीवरक्षक टीमने अपघातग्रस्तांचा शोध घेत रात्री उशिरा दोघांनाही रेस्क्यू केलं. दोघांनाही ग्रामीण रुग्णालयात उपचार करुन सोडण्यात आले.


कारवरील ताबा सुटला आणि कार 700 फूट दरीत कोसळली


सिंधुदुर्गच्या कणकवलीमधील कलमठ गावातील शेखर राणे आणि त्यांच्या पत्नी कोल्हापूरवरुन कारने घरी जात होते. यावेळी वैभवकरुळ घाटातून येत असताना त्यांचा कारवरील ताबा सुटला. यानंतर कार करुळ घाटातील सूर्यास्त पॉईंटवरुन 700 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात शेखर मनोहर राणे आणि दर्शना शेखर राणे हे कलमठमधील दाम्पत्य बालंबाल बचावले. दैव बलवत्तर म्हणून 700 फूट खोल दरीत कार कोसळूनही या दोघांचा जीव वाचला. 


ही घटना गुरुवारी (29 जून) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघाताची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ट्रकचालक आणि करुळ सह्याद्री जीवरक्षकच्या सहाय्याने दोघांना दरीतून बाहेर काढले. या अपघाताची नोंद वैभववाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


पोलीस आणि जीवरक्षक टीमने दोघांना सुखरुप बाहेर काढलं


कोल्हापूरहून कणकवलीकडे शेखर राणे हे आपली वॅगनार गाडीने करुळ घाट मार्गे जात होते. करुळ घाटातील धोकादायक वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने वॅग्नर कार 700 फूट खोल दरीत कोसळली. वाहन चालकानी करुळ चेक नाक्यावरील पोलिसांना या अपघाताबाबत माहिती दिली. नाक्यावर ड्युटीवर असलेले पोलीस राहुल तळसकर हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वैभववाडी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, उपनिरीक्षक खोत घटनास्थळी पोहोचले. तसेच करुळ सह्याद्री जीवरक्षक टीमही घटनास्थळी दाखल झाली. वॅगनार कार खोल दरीत कोसळली होती. जवळपास 700 फूट दरीत गाडी दिसत होती.  


पोलीस तळसकर, ट्रक चालक तुकाराम कोकरे, शिवाजी दामोदर गायकवाड, अभिमन्यू संजय पाताडे, सह्याद्री जीवरक्षक टीमचे काही युवक दरीत उतरले. दरीतून जखमींना दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले. नशीब बलवत्तर तर म्हणूनच या दोघांचा अपघातात जीव वाचला आहे. जखमी शेखर राणे आणि दर्शना शेखर राणे यांना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचा अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.


हेही वाचा


Sindhudurg News : भारतीय नौदल सिंधुदुर्ग किल्ल्यात उभारणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा