मुंबई: येत्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी तळकोकणातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हं आहेत. कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार आणि ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांच्या विरोधात भाजपच्या निलेश राणे यांनी निवडणुकीची तयारी (Vaibhav Naik vs Nilesh Rane) सुरू केल्याचं दिसून येतंय. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी सकाळी मुंबई ते कुडाळ मालवण अशी एक्सप्रेस गाडी सुरू होणार असून त्या गाडीला भाजपच्या नेत्यांकडून हिरवा झेंडा दाखवण्यात येईल. 


शिवसेना ठाकरे गटाचे जायंट किलर अशी ओळख असलेल्या वैभव नाईक यांना कोणत्याही परिस्थितीत पराभूत करण्याची तयारी राणे कुटुंबीयांकडून सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी हा मतदारसंघ बांधायला सुरूवात केली आहे. 


कुडाळ मालवणच्या मतदारांसाठी एक्सप्रेस गाडी 


सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या आधीच कुडाळ मालवण मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार निलेश राणे असतील असे जाहीर केले होते. याच कुडाळ मालवण येथील मुंबईत राहणाऱ्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न राणेंकडून सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी राणेंकडून कुडाळमध्ये लाखोंची दहिहंडी आयोजित करण्यात आली होती. आता कुडाळ-मालवणच्या मतदारांसाठी एक्सप्रेस गाडी शनिवारी सकाळी 10 वाजता सोडण्यात येणार आहे. या गाडीला हिरवा झेंडा भाजपच्या नेत्याकडून दाखवण्यात येईल. केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच निलेश राणे या कार्यक्रमाला उपस्तित असतील. 


Vaibhav Naik vs Nilesh Rane : वैभव नाईक यांचं निलेश राणेंना आव्हान


तळकोकणात राणे कुटुंब विरूद्ध वैभव नाईक हा वाद चांगलाच रंगताना दिसत आहे. 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा वैभव नाईक यांनी पराभव केला होता. त्यामुळे काहीकाळ राणे कुटुंबीयाची राजकारणातून पिछेहाट झाल्याचं दिसून आलं होतं. या निवडणुकीनंतर शिवसेनेत वैभव नाईक यांचे वर्चस्व वाढलं होतं. 


राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर वैभव नाईक यांच्यावर अँटिकरप्शन ब्युरोकडून चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी वैभव नाईक यांनी राणे कुटुंबीयांना खुलं आव्हान दिलं होतं. निलेश राणेंनी लोकशाहीच्या मार्गाने निवडणुकीत उभं राहून दाखवावे, असे आव्हान नाईक यांनी दिलं होतं. नारायण राणेंचा 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव केला. आता विधानसभेच्या निवडणुकीत निलेश राणेनी उभं राहून दाखवावं, त्यांना आस्मान दाखवणार असल्याचं नाईक म्हणाले होते. निलेश राणे मात्र निवडणुकीत उभं राहण्याचं धाडसही करणार नाहीत आणि भाजपही त्यांना तिकिट देणार नाही असा टोलाही नाईक यांनी लगावला होता. 


शिवसेना फुटीनंतर अनेक आमदार ठाकरेंना सोडून शिंदे गटात गेल्यानंतरही वैभव नाईक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. आता त्यांच्यासमोर भाजपचे मोठं आव्हान असून निलेश राणे त्यांच्याविरोधात निवडणुकीची तयारी करत आहेत. 


ही बातमी वाचा: