First Transgender Government Teacher : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील रिया आवळेकर यांनी देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका (Transgender Government Teacher) होण्याचा मान मिळवला आहे. प्रशासनाने त्यांचं स्वागत देखील केलं. मात्र प्रवीण ते रिया असा संघर्षमय प्रवास प्रशासनामुळे काहीसा सुकर झाला आहे. हाच संघर्षमय प्रवास आपण पाहणार आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील तुळसुली गावातील प्रवीण वारंग यांना लहानापासून शिक्षणात आवड होती. त्यांच्या काकीने त्यांना अध्यापक अर्थात शिक्षक बनायला सांगितलं. त्यामुळे प्रवीण शिक्षक बनला. प्राथमिक शाळेपासून ते डीएडपर्यंत शिक्षण घेत असताना आपण पुरुष नसून स्त्री असल्याची भावना प्रवीणच्या मनात खदखदत होती. लहान असल्याने घरात सांगू शकत नव्हते. मात्र मनाची कायम घुसमट होत होती. जसजसं वय वाढत जात होत तसतसं आपण पुरुष नसून स्त्री असल्याची भावना अधिक दृढ होत होत्या. मात्र त्यांनी स्वतःचं अस्तित्त्व निर्माण करत प्रवीणपासून रिया आवळेकर असा प्रवास केला.  


शिक्षण घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पाट गावामधील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवीण शिक्षक म्हणून कार्यरत झाला. लहानपणीच आपण आपलं काहीतरी बनून अस्तित्त्व निर्माण करायचं, या उद्देशाने त्यांनी शिक्षण घेऊन शिक्षण क्षेत्रात करिअर सुरु केलं. मात्र मनात एकच खदखद होती ती आपण पुरुष नसून स्त्री असल्याची. मनात होणारी ही घुसमट त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तृतीयपंथी कल्याणकारी बैठकीत जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांना सांगितली. त्यानंतर प्रशासनाने त्यांना योग्य ती मदत केली. 


2019 मध्ये प्रवीणची रिया बनली
प्रवीण यांनी 2019 मध्ये आपली सर्जरी केली. त्यानंतर देखील त्यांनी पुरुषी वेशात आपलं अध्ययनाचं काम सुरु ठेवलं. मे 2022 मध्ये त्यांनी आपण तृतीयपंथी असल्याची माहिती त्यांनी प्रशासनाला दिली. त्यात जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी त्यांना मोलाचं सहकार्य केलं. प्रवीणची रिया आवळेकर झाली आणि देशातील पहिल्या तृतीयपंथी शिक्षिका होण्याचा मान देखील मिळवला. मात्र हा प्रवास निश्चितच सोप्पा नव्हता. 


...अखेर मनातील घुसमट, खदखद दूर झाली
लहानपणापासून चालण्यात, बोलण्यात आणि वागण्यात पावलोपावली बदल जाणवत होते. मात्र जन्म झाला तेव्हा घरातले मुलगा झाला म्हणून खुश होते. मात्र जेव्हा मला आपण पुरुष नसून स्त्री असल्याच्या भावना समजत होत्या त्यावेळी मी कुणालाही सांगू शकत नव्हते. त्यामुळे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहून आपण आपलं अस्तित्त्व सिद्ध करायचं ठरवलंआणि आज प्रवीणची रिया आवळेकर झाली. शिक्षण घेऊन शिक्षक बनून गेली दहा वर्षे त्या मुलांना शिक्षण देत आहेत. दहा वर्षांनतर प्रवीणने लहानपनापासून होणारी घुसमट, मनातील खदखद सर्जरी करुन दूर करत देशातील पहिल्या तृतीयपंथी शिक्षिका होण्याचा मान मिळवला.


कुटुंबासह प्रशासनाचं मोलाचं सहकार्य
देशातील पहिली तृतीयपंथी शिक्षिका असल्याचा आज अभिमान आहे. यासाठी मला माझं कुटुंब तसेच जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाने खूप सहकार्य केले. आज रिया आवळेकर या पहिल्या तृतीयपंथी शिक्षिका असल्या तरी देखील काही तांत्रिक बाबी लक्षात घेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजोत नायर यांच्या इथे स्वीय सहाय्यक म्हणून तात्पुरतं काम पाहत आहेत.