Sindhudurg Rain Updates: सिंधुदुर्गसाठी (Sindhudurg Rain) पुढील 48 तास रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तर आज कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधारेचा (Rain Updates) इशारा आहे. अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचं 'डिप्रेशन'मध्ये रुपांतर झाल्यानं पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्टा तयार झाला असल्यानं सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस कोसळत आहे. 3 ऑक्टोबरपर्यंत कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात वाऱ्यांचा वेग वाढला आहे. 45 ते 55 कि. मी. सध्या वारे वाहत असल्यानं पश्चिमी वाऱ्याचा जोर वाढला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. खोल समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्यानं मासेमारी बंद आहे, तर समुद्र पर्यटन ठप्प आहे. 400 नौका सुरक्षिततेच्या दृष्टीनं देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. तामिळनाडू, गोवा, गुजरात, महाराष्ट्र राज्यातील नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत.




देवगड बंदरात राज्यासह इतर राज्यातील 400 नौका आश्रयाला


समुद्रात वादळ सदृश्य स्थिती निर्माण झाल्याने देवगड बंदरात राज्यासह इतर राज्यातील 400 नौका आश्रयाला आल्या आहेत. देवगड बंदर हे सर्वात सुरक्षित बंदर म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडूसह 400 नौका देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत. हवामान विभागानं 3 ऑक्टोबरपर्यंत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे देवगड बंदरामध्ये सुमारे 400 हून अधिक नौका सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत. यामध्ये गुजरातमधील 180 नौका, तर तामिळनाडूमधील पाच नौकांचा समावेश आहे. हवामान 3 ऑक्टोबरपर्यंत ताशी 45 ते 65 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा आणि अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.




आज 'या' भागांत अतिवृष्टीचा इशारा


1 ऑक्टोबर रोजी 12.15 रात्री नवीन उपग्रहांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, रायगड या भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही भागांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, काही ठिकाणी जमीन खचण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


अलिबाग जेट्टीनजीक मासेमारी होडी बुडाली, सुमारे चार लाखांचे नुकसान


अलिबाग किनाऱ्यावरील जेट्टी परिसरात मुसळधार पाऊस,भरतीच्या लाटा आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नांगरून ठेवलेली मासेमारी नौका बुडाली.हवामान बदलामुळे ही नौका किनाऱ्यावरच होती.पाऊस थांबल्यानंतर नौका शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु नौका लाटांच्या प्रवाहात समुद्रात वाहून गेली असल्याचा अंदाज मच्छीमारांनी व्यक्त केला आहे. नौका मालकाचे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे कोळी बांधवांनी संगितले. मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता.त्यानुसार रायगड जिल्ह्यात पावसाळी वातावरण होते. यामुळे मच्छीमारांना समुद्रात जाण्यास प्रतिबंध करण्यात आला होता.यामुळे कस्टम बंदरातील नाखवा राकेश बळीराम भगत यांनी आपली मासेमारी नौका बंदरावर नांगरून ठेवली होती.सायंकाळी वातावरणात बदल झाला. सोसाट्याचा वारा,मुसळधार पाऊस आणि समुद्राला आलेली भरतीच्या लाटांच्या माऱ्यात मासेमारी नौकेचा टिकाव लागला नाही. यामुळे नौका अलिबाग समुद्रातील बंदर परिसरात बुडाली. नौका बुडाली तेव्हा नौकेत कोणीही खलाशी नव्हते.यामुळे बीटीचे चार लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. बुडालेली मासेमारी नौका शोधण्याचा प्रयत्न स्थानिक कोळी बांधवांनी केला. परंतु, नौका सापडली नाही.समुद्राच्या लाटांच्या प्रवाहात बोट समुद्रात वाहून गेली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.