Nilesh Rane :  सिंधुदुर्गातील कुडाळ मालवण (Kudal Malvan) मतदारसंघ गेल्या साडेनऊ वर्षापासून ओसाड पडला होता. विकासकामे कागदावर राहिली ती अस्तित्वात कधीही दिसली नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून आमदार खासदारांकडून कागद दाखवले जायचे हे काम मी मंजूर केलं अश्या वल्गना केल्या जातात. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी व्यासपीठावर येऊन सांगावं गेल्या साडेनऊ वर्षात कोणती विकास काम केली, दुसऱ्यांनी केलेली विकास काम आपली असल्याच्या वल्गना करून नये समोरासमोर येऊन सांगा असं आव्हान माजी खासदार आणि भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी दिले आहे.


राज्यातील 288 आमदारांपैकी आपल्या मतदारसंघातील आमदाराला अनाडी बोलायची वेळ माझ्यावर केव्हा येईल असं मला वाटलं नव्हते असा बोचरा वार निलेश राणे यांनी केला. वैभव नाईक चोरांसारखे येऊन भूमिपूजन करत असल्याचा आरोप निलेश राणेंनी भर व्यासपीठावरून केला. 


माध्यमांशी बोलताना आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांना निलेश राणेंनी आव्हान दिले. व्यासपीठावर येऊन लोकांना सांगा जी विकास कामं होतायेत ती तुम्ही आणली की आम्ही आणली. जर हे तुम्ही दाखवू शकला नाही तर आमच्या पालकमंत्र्यांच अभिनंदन देखील तुम्हाला करावं लागेल असेही राणे यांनी म्हटले. 


निलेश राणे यांनी म्हटले की, आम्ही आधी दुसऱ्याच्या मुलाला आमचं मूल समजत नाही. नारायण राणे 2014 पर्यंत पालकमंत्री होते. आता रविंद्र चव्हाण पालकमंत्री आहेत. लोकांना आधी मंत्रालयासमोर गुडघे टेकायची गरज पडली नाही, निधी सहज मिळाला. मात्र गेली साडेनऊ वर्ष हा मतदारसंघ आमदार वैभव नाईक यांच्यामुळे ओसाड पडला असल्याची टीका राणे यांनी केली. 


मोदींमुळे विकासकामांचा झंझावात 


माजी खासदार निलेश राणे यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. न होणारी कामेदेखील या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदीनी करून दाखवली. देशात विकास कामाचा झंझावात लावला. आता लोकसभा निवडणुक तोंडावर आहे, तर ऑक्टोबर मध्ये विधानसभा निवडणुका होतील मात्र ज्या माणगाव खोऱ्यात ठाकरे गटाला मतदान होत ते नेमकं कशासाठी आणि का होतं हे अद्याप कळलं नाही असेही राणे यांनी म्हटले. नऊ वर्षात हा मतदारसंघ रिकामी राहिला, विकास कामाच्या बाबतीत फक्त कागद मिळाले, त्याचीही रद्दी झाली मात्र विकासकामे अस्तित्वात आली नसल्याचे राणे यांनी म्हटले.