Raj Thackeray: मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारीत असलेल्या चित्रपटांबाबत, ऐतिहासिक मुद्यांवरून वाद सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यावर भाष्य केले आहे. जातीपलिकडे जाऊन इतिहास पाहणं गरजेचं असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. इतिहासाकडे जाती पाहून पाहण्याचा काही लोकांचा दृष्टिकोण आहे. त्यातही त्यांचा राजकीय स्वार्थ असल्याचे त्यांनी सांगितले. इतिहास अभ्यासकांच्या मते नेसरीतील लढाईत प्रतापराव गुजर यांच्यासह सात जण होते की दहा जण होते याबाबतही स्पष्टता नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही निशाणा साधला.
राज ठाकरे हे सध्या पक्ष बैठकांच्या निमित्ताने कोकण दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विविध प्रश्नांना उत्तरे त्यांनी दिली. 'वेडात वीर दौडले सात'मध्ये सात जणांच्या नावाबाबत काही वाद निर्माण झाले होते. काहींनी सात मावळ्यांची नावे दुसरी असल्याचे म्हटले होते. याबाबत बोलताना राज ठाकरे यांनी म्हटले की, या वादाच्या अनुषंगाने मध्यंतरी आपण इतिहास अभ्यासक गजानन मेंहदळे यांच्याशी चर्चा केली होती. जगात कोणत्याही इतिहासाच्या पानात ते सात, आठ की दहा होते, हे नमूद करण्यात आलेले नाही. कोणत्याही पानात प्रतापराव गुजर यांच्यासोबत कोण गेले, याबद्दलही स्पष्टता नाही. आतापर्यंत ऐकलेली नावे ही काल्पनिक नावे असल्याचे मेंहदळे यांनी सांगितले असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. छत्रपती शिवरायांनी प्रतापराव गुजर यांना पत्र पाठवले, असं पत्र आजवर कुठेही सापडले नाही. ते पत्र पाठवले असा त्याचा एक दाखला आहे. मात्र, त्याशिवाय इतर कोणताही दाखला नसल्याचे मेंहदळे यांनी सांगितले. 'प्रतापराव गुजर मारलिया' आणि 'प्रतापराव गुजर पडला' या दोन ओळी एका पत्रात आहेत. या दोन ओळी सोडल्या तर इतर कोणत्याही ठिकाणी त्या लढाईचा उल्लेख नसल्याचे गजानन मेंहदळे यांनी आपल्याला सांगितले असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले.
कोल्हापूर दौऱ्यात इतिहास अभ्यासक जयसिंग पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी गजानन मेंहदळे यांच्या दाव्याला दुजोरा दिला असेही राज यांनी म्हटले. इतिहासाच्या पानात त्याचा कोणताही संदर्भ नसल्याचे त्यांनी म्हटले. राज ठाकरे यांनी म्हटले की, इतिहासातून स्फुरण चढण्यासाठी काही तर्कावर गोष्टी, पोवाडे म्हटले जातात. तर्कातून इतिहास उभा केला जातो. त्यातून गोष्टीच्या स्वरुपातून समोर येत असतात असेही राज ठाकरे यांनी म्हटले. इतिहास तज्ज्ञांनी काही गोष्टी स्पष्टपणे समोर मांडण्यांची आवश्यकता असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले.
कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी खिंडीतील युद्धात छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यासह सात मावळ्यांनी मुघल सरदार बहलोलखानच्या हजारो सैन्याच्या छावणीत शिरून मुघल सैन्यांची दाणादाण उडवली होती. मात्र, यामध्ये प्रतापराव गुजर आणि मावळ्यांना वीरमरण आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल
जातीच्या राजकारणासाठी महाराजांबाबतच्या काही गोष्टी समोर आणल्या जात असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे सुरू असल्याचा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात हे प्रकार सुरू झाले असल्याचे त्यांनी म्हटले. शरद पवार हे नेहमी शाहू फुले आंबेडकर हीच नावे घेतात. शिवाजी महाराजांचे यामध्ये नाव घेत नाहीत. इतर समाज आणि मराठा समाजात फूट पाडण्याचे काम सुरू असून 1999 पासून राज्यात विष कालवले जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी म्हटले.
समान नागरी कायदा हवाच
समान नागरी कायदा हा केंद्र सरकार ठरवतो. तो राज्य ठरवत नाही. तो आला पाहिजे. समान नागरी कायदा असावा अशी आमची आधीपासून मागणी आहे, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.