Success Story : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Sindhudurg News) कणकवली तालुक्यातील चिंचवली या छोट्याशा गावातील मंदार पेडणेकर या तरुणाने वडिलोपार्जित जमिनीवर पोल्ट्री फार्मचा (Poultry Farm) व्यवसाय सुरू केलाय. आठ गुंठामध्ये शेड उभारत सुरुवातीलाच दहा हजार कोंबड्यापासून नऊ हजार दोनशे अंडी दर दिवसाला मिळायला सुरुवात झाली. मंदार पेडणेकर या तरुणाचा जन्म मुंबईचा आणि शिक्षणही मुंबईतच झालेलं. मुंबईत व्यवसायिक शिक्षणाचे धडे गिरवले. एमबीए फायनान्सचं शिक्षण घेतलं मात्र नोकरी नसल्याने आपल्या चिंचवली या मूळ गावी येत पोल्ट्री फार्म सुरू करण्याचा निर्णय घेतला. वडिलोपार्जित दीड एकर जमिनीमध्ये पोल्ट्री फार्म उभा केला. आठ गुंठामध्ये शेड उभारून दहा हजार कोंबडी असलेला लेहर पोल्ट्री उद्योग गावात सुरू केला. 


कोरोनाचा काळ आणि मुंबईतील नोकरीचा कोणताही भरोवसा नसल्याने कोरोनाच्या काळात वेगवेगळ्या व्यवसायाची चाचपणी सुरू केली. त्यातून त्याने पोल्ट्री फॉर्म सुरू करण्याचे ठरवले. कोंबडी लेहर पोल्ट्री फार्ममध्ये जोखीम कमी आहे. त्यामूळे आपण कोंबडी लेहर पोल्ट्री व्यवसाय सुरू करायचं ठरवलं. त्यासाठी गावाकडील वडिलोपार्जित जमिनीवर शेड उभारायची ठरवली. त्यासाठी लागणारं भाग भांडवल वडिलांच्या निवृत्ती वेतनातून उभ केलं. 


कोंबड्याचा लेहर पोल्ट्री उद्योग उभा करण्यासाठी 60 ते 65 लाख रुपये खर्च आला. वडील सरकारी कर्मचारी म्हणून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीतून मिळालेल्या रकमेतून हा प्रोजेक्ट त्याने उभा केला. वडिलांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर मुंबईला नोकरी कर किंवा व्यवसाय सुरू कर असं सांगितलं होतं. वडिलांच्या पुण्याईमुळे मंदार हा व्यवसाय सुरू करू शकला. वडिलांचं स्वप्न प्रत्यक्षात साकारत असतानाच वडिलांचं अचानक निधन झाले. त्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र त्यातून सावरून पुन्हा हा व्यवसाय उभा करण्यासाठी प्रयत्न करून हा व्यवसाय सुरू केला.


कोंबड्यांचा लेहर पोल्ट्री उद्योगामध्ये आज दहा हजार पक्षी आहेत. या दहा हजार कोंबड्यापासून नऊ हजार दोनशे अंडी दिवसाला मिळतात. या अंड्यापासून महिन्याला निव्वळ नफा एक ते दीड लाख रुपये मिळतो. सध्या ही अंडी स्थानिक बाजारपेठेत विकली जातात. लेहर पोल्ट्री उद्योगामध्ये सहा कामगार काम करतात. कोंबड्यांसाठी लागणारं खाद्य स्वतःच बनवतात. मका, सोयाबीन पेंड, स्टोन ग्रीड तसेच मेडिसिनमध्ये विविध घटक मिक्स असतात. कच्च खाद्य बाहेरून मागवलं जातं. कोंबड्यांना दिवसाला एक टन खाद्य लागतं. एक कोंबडी 100 ते 120 ग्रॅम खाद्य खाते. एप्रिल महिन्यापासून सुरू झालेला हा लेहर पोल्ट्री उद्योग सध्या यशस्वीपणे सुरू आहे. गावातील तरुणांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे.


वेंकेज BV३०० जातीच्या कोबड्या या लेहर पोल्ट्री उद्योगात आहेत. या त्यांच्या संपूर्ण आयुष्यात 300 अंडी देतात. 12 आठवड्याच्या कोंबड्या आणल्या. 17 ते 18 आठवड्यांनी अंडी देण्यास सुरुवात करतात. 72 आठवड्यापर्यंत ह्या कोंबड्या अंडी देतात. त्यानंतर त्या मांसासाठी विकल्या जातात. 


दहा हजार कोंबड्यापासून दिवसाला 9200 अंडी मिळतात. प्रति अंड 3.5 ते 4.5 या दराला विकले जातात. स्थानिक बाजारपेठेतील व्यापारी ही अंडी घेऊन जातात. दिवसाला अंड्यापासून सरासरी 35 ते 36 हजारापर्यंत उत्पन्न मिळते. सरासरी 4 रुपये दर पकडल्यास 36,800 रूपये मिळतात. तर महिण्याकाठी 11 लाखापर्यंत उत्पन्न मिळते. त्यातून पक्षांच्या खाद्यासाठी लागणारा कच्चा माल बनवणे, कामगारांचे पगार, पक्षांसाठी लागणारे औषध याचा खर्च वजा केल्यास महिन्याला दीड लाख निव्वळ नफा मिळतो.


दहा हजार कोंबड्याना दिवसाला एक टन खाद्य लागत. हे खाद्य मंदार स्वतः कच्चा माल आणून बनवतात. त्यामुळे त्यांना हे खाद्य 28 ते 29 रुपयांना पडते. तर बाजारात हे खाद्य 33 रुपये किलो आहे. त्यामुळे एक टन खांद्याला दिवसाला 29,000 म्हणजे महिन्याकाठी आठ लाख सत्तर हजार रुपये खर्च येतो. 


महिन्याला दोन लाख 76 हजार अंड्यांपासून 11 लाख चार हजाराचे उत्पन्न मिळतं. त्यातून दहा हजार कोंबड्याना महिन्याला खाद्यासाठी आठ लाख 70 हजार खर्च तर कामगारांचा 30 हजार खर्च तर औषधांसाठी 10 हजार रुपये आणि इतर खर्च वगळता मंदारला महिन्याकाठी दीड लाख रुपये निव्वळ उत्पन्न नफा होतो.