सिंधुदुर्ग : राज्यातील 288 विधानसभा निवडणुकांसाठी (Vidhansabha) घेण्यात आलेल्या मतदानासाठी आज निकालाचा दिवस उजाडला. गेल्या कित्येक महिन्यांपासून असलेली उत्सुकता आज अधिकच शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळालं. त्यामध्ये, बिग फाईट्स म्हणजेच राज्यातील बड्या नेत्यांची मुलेही मैदानात उतरली आहेत. त्यामध्ये अनेक ठिकाणी काका-पुतण्या, बाप-लेक, भाऊ-भाऊ हेदेखील आपलं नशिब आजमावत आहेत. त्यामुळे, या नेत्यांच्या लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामतीमध्ये पवार काका-पुतण्या, कर्जत-जामखेडमधून आमदार रोहित पवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये अडकलं. तर, मुंबईत ठाकरे बंधू आणि कोकणातील राणे (Nitesh Rane) बंधुंच्या लढतींकडेही राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण, यंदा कोकणात आमदार नितेश राणे आणि निलेश राणे दोघेही निवडणुकीच्या रणांगणात आहेत. येथील मतदारसंघात सुरुवातीच्या कलानुसार कणकवली मतदारसंघात नितेश राणे यांनी आघाडी घेतली होती. तर, दोन्ही राणे बंधुंचा विजय झाल्याची माहिती समोर आली आहे. कुडाळ-मालवण मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे वैभव नाईक यांचा देखील यंदा पराभव झाला आहे.
कोकणातील या दोन नेत्यांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते, त्यामुळे, सकाळपासूनच येथील मतदारसंघातील निकालावर नजरा खिळून होत्या. अखेर, नितेश राणे आणि निलेश राणे या दोघांचाही विजय झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे निलेश राणे यांनी निवडणुकांपूर्वीच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करुन निवडणूक लढवली होती. अखेर, त्यांनाही येथील मतदारसंघात यश मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. नितेश राणे यांना तब्बल 53 हजार मतांचं मताधिक्य मिळालं आहे. 53,893 मतांनी नितेश राणे विजयी झाल्याने त्यांचा हा मोठा विजय आहे. तर, कुडाळमध्ये नितेश राणे यांना पहिल्या 18 फेरीत 6600 मतांचे मताधिक्य होते. त्यामुळे, त्यांचाही विजय निश्चित मानला जात आहे.
भाजप खासदार नारायण राणे यांचे दोन्ही मुलं यंदा आपलं राजकीय भवितव्य पणाला लावून निवडणुकीच्या मैदानात होते. कोकणताील ह्या दोन्ही राणे बंधुसाठी ही प्रतिष्ठेची लढाई ठरली, कणकवली विधानसभा मतदार संघातून भाजपने नितेश राणे यांना उमेदवार दिली आहे. येथे शिवसेना ठाकरे गटाने संदेश पारकर यांना तिकीट दिलं आहे. दोघांमध्ये काँट की टक्कर पाहायला मिळाली. तर, निलेश राणे यांना कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार वैभव नाईक मैदानात आहेत. वैभव नाईक हे ठाकरेंच्या शिवसेनेशी एकनिष्ठ राहिल्याने त्यांचं पारडं जड मानलं जात होतं. येथील भावांच्या लढतीकडेही राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा
पवार, ठाकरे, देशमुख, राणे, शेलार बंधू मैदानात; बारामतीतही लक्षवेधी लढत; कुठून कोण जिंकलं, कोण हरलं?