Maharashtra Vidhansabha Election Result 2024 मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठीचा (Vidhansabha) निकाल हाती येत असून नात्यागोत्यांच्या आणि भाऊबंदकीच्या लढतींकडे राज्याचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघातून भाऊ-भाऊ आणि बहिण भाऊ निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे, भावा जिंकलास का, असा सवाल करत या भावांच्या लढतींकडे मतदारसंघातील आणि आजुबाजूच्या मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. त्यामध्ये, राजकारणातील मोठे घराणे आणि राजकीय पक्षांचे प्रमुख असलेल्या पवार, ठाकरे, कुटुंबातीलही सदस्य मैदानात उतरले आहेत. मुंबईतून दोन ठाकरे मैदानात असून अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून यंदा प्रथमच निवडणूक लढवत आहेत. तर, शिवसेना युबीटी आमदार आदित्य ठाकरे हे दुसऱ्यांदा वरळीतून (Worli) निवडणूक लढवत आहेत. यांसह, राज्यातील अनेक मतदारसंघात अशा लढती होत असून या लढतींकमध्ये कोणी बाजी मारली, कोणाचा पराभव झाला आणि कोण-कोण जिंकले याचा आढावा या लेखातून घेण्यात आला आहे.
Disclaimer: निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. विजयी उमेदवारांची यादी अपडेट होत आहे. त्यानुसार बातमी रिफ्रेश करा. राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर
1. बारामती - अजित पवार Vs युगेंद्र पवार
अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या अशीच लढत होत आहे. या मतदारसंघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीचे उमेदवार असून त्यांच्याविरुद्ध त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हे महाविकास आघाडीकडून मैदानात आहेत. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. सुरुवातीच्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार अजित पवारांनी येथून आघाडी घेतली आहे.
2. मुंबई - ठाकरे बंधू
मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे हे दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा तर मनसेकडून संदीप देशपांडे मैदानात आहेत. त्यामुळे, येथील मतदारसंघातही चूरस आहे. त्याचसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून मैदानात आहेत. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत हे त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे, वरळी आणि माहीम मतदारसंघात काय होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार आदित्य ठाकरेंनी आघाडी घेतली असून माहीमध्ये अमित ठाकरे पिछाडीवर आहेत.
3. मुंबई - शेलार बंधू भाजपकडून मैदानात
भाजपने आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिममधून तर त्यांचे बंधू विनोद शेलार यांना मालाड पश्चिममधून उमेदवारी जाहीर केली आहे. आशिष शेलार यांच्याविरोधात काँग्रेसने आसिफ झकेरिया यांना मैदानात उतरवले आहे. तर, विनोद शेलार यांच्या विरोधात काँग्रेसने आपले तीन टर्म आमदार झालेले विद्यमान आमदार अस्लम शेख यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे, येथील भावा-भावांच्या लढतीकडेही मुंबईचे लक्ष लागले आहे.
4. कोकण - राणे बंधुही मैदानात
कोकणताील दोन्ही राणे बंधुही यंदा मैदानात आहेत, कणकवली विधानसभा मतदार संघातून भाजपने नितेश राणे यांना उमेदवार दिली आहे. येथे शिवसेना ठाकरे गटाने संदेश पारकर यांना तिकीट दिलं आहे. तर, निलेश राणे यांना कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार वैभव नाईक मैदानात आहेत. येथील भावांच्या लढतीकडेही राज्याचे लक्ष लागले आहे.
5. लातूर - देशमुख बंधू
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे दोन्ही पुत्र मैदानात आहेत. लातूर शहर मतदारसंघातून विद्यमान आमदार अमित देशमुख आहेत, त्यांविरोधात अर्चना पाटील चाकूरकर निवडणूक लढवत आहे. तर दुसरीकडे लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख मैदानात असून त्यांना भाजप महायुतीच्या रमेश कराड यांचं आव्हान आहे. येथील मतदारसंघात दोन्ही देशमुख बंधू आघाडीवर आहेत.
6. संभाजीनगर - दानवे बहीण-भाऊ
भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा मुलगा आणि विद्यमान आमदार संतोष दानवे हे देखील निवडणूक लढवत आहेत. संतोष दानवे हे भोकरदन विधानसभा मतदारसंघून निवडणूक लढवत आहेत, त्यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत दानवे हे निवडणूक लढवत आहेत. तर, रावसाहेब दानवे यांची कन्या कन्नड विधानसभा मतदारसंघातून मैदानात आहे. येथे संजना जाधव यांच्याविरुद्ध मविआकडून उदयसिंह राजपूत निवडणूक लढवत आहेत. याशिवाय, त्यांचे पती हर्षवर्धन पाटील हेही मैदानात आहेत.
7. बीड - संदीप क्षीरसागर Vs डॉ.योगेश क्षीरसागर
बीड विधानसभा मतदारसंघाकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात त्यांचे चुलत बंधू डॉ. योगेश क्षीरसागर महायुतीचे उमेदवार आहेत. येथील लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे.
8. जळगाव - किशोर पाटील Vs वैशाली सूर्यवंशी
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा विधानसभा मतदारसंघातील लढत देखील महत्वपूर्ण मानली जातेय. या मतदारसंघात शिवसेनेचे शिंदे गटाकडून विद्यमान आमदार किशोर पाटील यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून त्यांच्याच भगिनी वैशाली सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाऊ विरुद्ध बहीण असा सामना रंगत आहे.