Maharashtra Ganeshotsav 2022 : महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वात लोकप्रिय आणि सर्वांचा आवडता उत्सव असलेला गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कोकणातील गावागावांत गणेश कार्यशाळांमध्ये गणेश मूर्ती बनवण्यासाठी मुर्तीकारांचे हात वेगाने सुरू आहेत. कोकणात (Konkan) परंपरागत मूर्तिशाळांचा इतिहास, आधुनिक पद्धतीनं बनवण्यात येणाऱ्या गणेश मूर्ती, व्यवसायाचं बदलतं स्वरूप, मुर्तीकारांचं आर्थिक गणित आणि पर्यावरणस्नेही मूर्तींची गरज याबाबत एबीपी माझानं कोकणातील मूर्तीकारांशी बातचित केली आहे.
गणेश मूर्ती बनवणं ही एक कला आहे. ही कला मातीतून तयार करावी लागते. कोकणात पारंपरिक पद्धतीनं गावागावांत मिळणारी चिकट माती, शाडू माती आणि आता लाल माती यांपासून गणेशाची मूर्ती घडवल्या जात आहेत. मात्र आता तयार पिओपीच्या मुर्ती कोकणातील वाड्या वस्त्यांवर येऊ लागल्यानं या क्षेत्रात 10 टक्के कला शिल्ल्क राहिली असून 90 टक्के व्यापार झाला आहे. आता कोणीही उठतो आणि लगेच व्यापारी बनतो. खरा कलाकार मात्र उपेक्षितच राहू लागला आहे. तर पिओपीच्या मुर्तींचं विघटन होत नाही. मूर्ती विसर्जन केल्यानंतर विटंबना होते. तसेच पिओपीच्या मुर्तींमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण देखील होतं. त्यामुळे पिओपीला लाल माती हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो.
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाचे वेध सर्वांनाच लागलेले असून दिवसरात्र गावागावातील गणेशशाळा गजबजू लागल्या आहेत. पिढ्यानपिढ्या गणेशमूर्ती घडविणारे मूर्तीकार आता गणरायाच्या मूर्तीच्या निर्मितीमध्ये व्यस्त आहेत. कोकणात तर परंपरागत गणेशमूर्ती घडविणारे अनेक कलाकार आहेत. आपली पिढीजात कला आजही टिकवून ठेवलेली आहे. ग्रामीण भागांत अनेक ठिकाणी चांगले मूर्तिकार यानिमित्तानं असल्याचं दिसून येत आहेत. आपल्या कुंचल्यातून सुंदर गणेशमूर्ती घडविण्याचं काम अनेक वर्षे करताना दिसतात. केवळ एक कला, मानसिक समाधान आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली कला जोपासली गेली पाहिजे, यासाठीच ही परंपरागत कला चालू आहे. आपण व्यवसाय म्हणून याकडे न पाहता कोणतीही अपेक्षा न ठेवता निष्ठेनं हा व्यवसाय करत असल्याचं ग्रामीण भागातील अनेक मूर्तिकार सांगतात. कोकणात घरगुती गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यामुळे प्रत्येक गणेश मूर्तिकारांकडे किमान 100 ते 200 विविध आकारातल्या मातीच्या गणेशमूर्ती असतात. या गणेशोत्सवाची चाहूल किमान दोन महिने पूर्वीपासून लागते.
कोकणात प्रामुख्यानं चिकट माती जी गावागावांत मिळते त्यापासून गणेशमूर्ती घडवल्या जातात. मात्र आता शाडू मातीच्या देखील मूर्ती मोठ्या प्रमाणावर घडविल्या जात आहेत. तळकोकणात यावर्षी कर्नाटकमधून लाल माती आणून वजनाला हलक्या मुर्त्या आणि दिसायला सुबक मुर्त्या बनवल्या जात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले आरवली येथील मूर्तिकार रविराज चिपकर यांनी हा प्रयोग केला आहे. या लाल मातीच्या मूर्ती पिओपीच्या मूर्तींना पर्याय ठरू शकतात. तसेच या मूर्तींचं विघटनसुध्दा लवकर होऊन पर्यावरण पूरक मूर्ती घडवल्या जात आहेत. तसेच कोकणात कागदाच्या लगद्यापासूनही गणेशमूर्ती बनविल्या जातात. पर्यावरणप्रेमी तर वर्षानुवर्ष अशाचप्रकारच्या गणेशमूर्ती आणतात.
गणेशमूर्ती साकारताना मूर्तीकारांचं कसब लागतं. त्यात त्यांची जबाबदारी वाढलेली असते. कोकणातल्या या गणेशोत्सवासाठी विविध ठिकाणचे चाकरमानी आवर्जून येतात. दरवर्षी माती, रंगाचे वाढलेले दर शिवाय कामगारांची वाढलेली मजुरी आणि गणेशमूर्तींमधून मिळणारी रक्कम याचा मेळच बसत नसल्याचंही मूर्तीकार सांगतात. एक गणपतीची मूर्ती तयार व्हायला पंचवीस कलाकांराचे हात राबत असतात. यात मूळ शिल्प घडवणारे, त्याचे साचे पाडणारे, मूर्ती करणारे, रंगकाम करणारे, डोळ्यांची आखणी करणारे अशा कारागिरांसोबतच मूर्तींना पॉलिश करणं, साधा रंग लावणं यापासून ते गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरवणं याची लगबग सध्या कोकणातील गावागावांत पहायला मिळत आहे.