सिंधुदुर्ग : ज्या माणसाला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा राहिला आहे, असे लोक केवळ पैशाच्या जीवावर लोकांना विकत घ्यायचा प्रयत्न करतात अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे सावंतवाडीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी भाजपचे बंडखोर विशाल परब यांच्यावर केली. दुसरा उमेदवार हा क्रिमिनल बॅकग्राऊंडचा असून तो पुराव्याअभावी निर्दोष सुटल्याची टीकाही त्यांनी केली. 


विरोधी उमेदवारावर टीका करताना दीपक केसरकर म्हणाले की, "सावंतवाडी मतदारसंघात ज्या-ज्यावेळी चौरंगी लढत झाली त्यावेळी माझा विजयाचे मार्जिन वाढले. गेल्या पाच वर्षात 2750  कोटीची काम झाली आहेत. सावंतवाडी मतदारसंघात कोणी कोणाला खरेदी करू शकत नाही. एक उमेदवार पैशाचा वारेमाप वापर करतोय. तर दुसरा उमेदवार खोटं बोलण्याचं काम करतो. विरोधक पर्यटनाबद्दल बोलतात, त्यांना नेमकं पर्यटनाबद्दल माहिती तरी काय आहे? लोकांच्या जमिनी बळकावून मोठ्या किमतींना इतरांना विकायच्या, मात्र शेतकऱ्यांना कवडीमोल भाव द्यायचा हे विरोधकांचं काम आहे."


सिंधुदुर्गात पर्यटानाचा विकास करणार


दीपक केसरकर म्हणाले की, केरळच्या धर्तीवर बोटीत बसून जंगलातील प्राणी पाहण्याचा पर्यटनात्मक प्रकल्प तिलारी धरणात सुरू करणार आहे. 250 एकर क्षेत्रावर 'अॅम्युझमेंट पार्क' उभारणार. आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन सिंधुदुर्गात सुरू करणार. वेंगुर्ले नीवती रॉक येथे पाणबुडी प्रकल्प सुरू करणार. ज्यांचा व्यवसाय जमिनीची खरेदी-विक्रीचा आहे, त्यांनी पर्यटनावर बोलावं यासारखाच दुर्दैव नाही. 


पैशाच्या जीवावर लोकांना विकत घेण्याचा प्रयत्न


दीपक केसरकर म्हणाले की, ज्या माणसाला today आणि tomorrow चा फरक कळत नाही असा माणूस निवडणुकीत उभा आहे. ते केवळ पैशाच्या जीवावर लोकांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात. माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा उपमुख्यमंत्र्यांना फोन झाल्यावर हे आपण जणू काय मोठे झालो आणि आपल्याला उपमुख्यमंत्री उमेदवारी अर्ज मागे घ्यायला सांगताहेत असा गैरसमज पसरवला. माझ्या प्रेमापोटी उपमुख्यमंत्र्यांनी यांना फोन केला. त्यामुळे हट्ट करून आणि लोकांना पैसे वाटून आमदार होता येत नाही असा टोला त्यांनी बंडखोर उमेदवार विशाल परब यांना लगावला.


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन तेली यांच्यावर आरोप करताना दीपक केसरकर म्हणाले की, दुसऱ्या उमेदवारांचे क्रिमिनल बॅकग्राऊंड असून मी केलेल्या विकासकामांचे ते नारळ फोडत सुटले आहेत. पुराव्याअभावी तुम्ही निर्दोष सुटालदेखील, याचा अर्थ तुम्ही त्या सहभागी नव्हता असा होत नाही. तुम्हाला अटक का झाली? 


माझ्याशिवाय विकासकामं पूर्णच होणार नाही


माझी अनेक विकासकाम अपूर्ण असल्यामुळे मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. अन्यथा मी एखाद्या तरुणाला संधी दिली असती. विकास कामांमध्ये मी स्वतः लक्ष घातलं नाही तर ती काम पूर्णच होत नाहीत असं दीपक केसरकर म्हणाले. जर्मनीमध्ये मॅन पॉवर कमी आहे हे शोधून काढून शिक्षण विभागात जर्मन भाषा समाविष्ट केली. त्यामुळे इथल्या मुलांना जर्मनीमध्ये काम मिळणार आहे असंही ते म्हणाले.  


स्वतःचं पुनर्वसन झालं पाहिजे म्हणून दुसऱ्यावर टीका करणे, निष्क्रिय म्हणणे चुकीचे आहे. भाजपमधून ते गेले ते बरं झालं. आता भाजप आणि शिवसेना एकत्र येऊन काम करू शकतो असं म्हणत दीपक केसरकर यांनी राजन तेली यांना टोला लगावला. 


ही बातमी वाचा: