सिंधुदुर्ग: कोकणातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतीय नौदलाने उभारलेला पुतळा कोसळल्याची दुर्घटना सोमवारी घडली होती. या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून राज्य सरकार आणि केंद्र सरकारविरोधात टीकेची झोड उठली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा इतक्या निकृष्ट दर्जाचा कसा उभारला जाऊ शकतो, असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत. मात्र, हा पुतळा भारतीय नौदलाकडून उभारण्यात आल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारकडून देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आता भारतीय नौदलाने एक निवेदन जारी करुन आपली बाजू स्पष्ट केली आहे.


या निवेदनात भारतीय नौदलाकडून सांगण्यात आले आहे की, 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनी सिंधुदुर्गवासियांना अर्पण केलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सोमवारी दुर्दैवीरित्या जे नुकसान झाले त्याविषयी आम्हाला अतीव दु:ख आहे. राज्य सरकार, संबंधित तज्ज्ञमंडळी आणि नौदलातील अधिकाऱ्यांचे पथक तातडीने या दुर्घटनेचे कारण शोधण्यासाठी काम सुरु करेल. ही दुर्दैवी दुर्घटना होती. छत्रपती शिवरायांचा पुतळ्याची दुरुस्ती करुन तो पुन्हा राजकोट किल्ल्यावर लवकरात लवकर बसवला जाईल, असे भारतीय नौदलातर्फे सांगण्यात आले. 


काँग्रेसचे नेते सतेज पाटील राजकोट किल्ल्यावर जाणार


आमचे प्रेरणास्थान, आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना अतिशय अस्वस्थ करणारी आहे..ज्या महाराजांचे किल्ले आज ३५० वर्षांनीही आपल्याला प्रेरणा देत आहेत त्यांचा पुतळा, तोही पंतप्रधानांनी उद्घाटन केलेला, एक वर्षेही टिकत नाही, हे मनाला पटतच नाही आहे.. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल या सरकारला किती बेगडी आदर आहे हेच यातून दिसतंय... या सरकार चा निषेध करावा तेवढा कमी आहे... या सर्व घटनेबद्दल आढावा घ्यायला व पुढील दिशा ठरवायला एक शिवप्रेमी म्हणून मी उद्या सकाळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह मालवणात, घटनास्थळी भेट देणार असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले होते. 


मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, समुद्रातील वेगवान आणि खाऱ्या वाऱ्यांमुळे पुतळ्याचे नुकसान


राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा 35 फुटी पुतळा कोसळल्यानंतर या दुर्घटनेचे खापर एकमेकांवर फोडण्याचा उद्योग सुरु झाला आहे. राज्य सरकारने या पुतळ्याची जबाबदारी भारतीय नौदलाची असल्याचे स्पष्ट केले होते. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण  यांनी मालवण पोलीस ठाण्यात जाऊन पुतळ्याची उभारणी करणाऱ्या आणि देखरेख करणाऱ्या संबंधित कंत्राटदारांवर गुन्हा दाखल केला होता. 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संपूर्ण कामाची तसेच निगा राखण्याची जबाबदारी ही नौदलाची होती. शिवरायांचा हा पुतळा नौदलाच्या अखत्यारीत येतो, त्यांनीच या पुतळ्याची उभारणी केली होती. यासंदर्भात मेसर्स आर्टीस्ट्री नावाच्या कंत्राटीला काम देण्यात आले होते. जयदीप आपटे हे कंपनीचे प्रोप्रायटर आहेत, तर केतन पाटील स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम पाहत होते. समुद्रकिनारी असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला गंज लागत असल्याचेही निदर्शनास आले होते. त्यानंतर 20 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागानं पत्र लिहून नौदलाच्या निदर्शनास आणून दिले होते, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले.



आणखी वाचा


सुप्रिया सुळे म्हणाल्या, कॉन्ट्रॅक्टर ठाण्याचा, मुख्यमंत्र्यांनी सांगितला वाऱ्याचा वेग; शिवरायांच्या पुतळ्यावरुन जुंपली