Ritiesh Deshmukh : नौदल दिनानिमित्त मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा 35 फूट पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या पुतळ्याचं अनावरण केलं होतं. पण 26 ऑगस्ट रोजी शिवाजी महाराजांचा हा पुतळा निकृष्ट कामामुळे कोसळला. या घटनेनंतर सोशल मीडियावर बरेच पडसाद उमटू लागले. त्यातच आता अभिनेता रितेश देशमुखचीही (Ritiesh Deshmukh) प्रतिक्रिया समोर आली आहे.
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागचं नेमकं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. दरम्यान या पुतळ्याची जबाबदारी नौदलाची होती, असं पत्र पालकमंत्र्यांकडून दाखवण्यात आलं. पण या घटनेमुळे राजकीय वर्तुळातलं वातावरण चांगलच पेटलं आहे. त्याचप्रमाणे आता आरोप प्रत्यारोपांचं सत्रही सुरु झालंय. असं असलं तरी या घटनेमुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याची चित्र सध्या आहे.
रितेश देशमुखची तीनच शब्दांत प्रतिक्रिया
अभिनेता रितेश देशमुख याने या घटनेवर व्यक्त होत केवळ तीनच शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. रितेशने एक्स पोस्ट करत महाराजांची माफी मागितली असून, 'राजे माफ करा' असं म्हटलं आहे. रितेशच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला!
संभाजीराजे यांनी ट्विट करत टीकास्त्र सोडलं आहे. संभाजीराजे यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला! मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही. अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार! आता त्याठिकाणी पुन:श्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचेच आहे. पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या इर्ष्येत परत काही गडबड करू नये. उशीर होऊदे पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे.
कसा होता मालवण येथील शिवाजी महाराज पुतळा?
- किल्ले राजकोट परिसराचं सुशोभीकरण तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जमिनीपासून उंची सुमारे 43 फूट एवढी आहे.
- बांधकाम जमिनीपासून 15 फूट तर त्यावर 28 फूट उंच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असं स्ट्रक्चर आहे.
- हा पुतळा नौसनेकडून उभारण्यात आला.
- ज्याचं उद्घाटन 4 डिसेंबर 2023 रोजी, नौसेना दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले.
- पुतळ्याची किंमत 2 कोटी 40 लाख 71 हजार एवढी रुपये एवढी होती.
- कल्याणचा तरूण शिल्पकार आणि मालवणचा सुपुत्र जयदीप आपटे यांनी हे शिल्प बनवलं आहे.