Shiv Thakare On Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) हा लोकप्रिय कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला असून या पर्वात कोण बाजी मारणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. या पर्वात 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss) दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे (Shiv Thakare) बाजी मारू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत शिव ठाकरेच्या लाडक्या बहिणीने म्हणजेच मनिषा ठाकरेने (Manisha Thakare) आपला विश्वास व्यक्त केला आहे. शिवची बहिण म्हणाली,"बिग बॉस 16' 100% माझा भाऊच जिंकणार".
शिवची बहिण म्हणाली,"बिग बॉस 16' लवकरच संपणार आहे. मराठी 'बिग बॉस' शिवने गाजवलं आहे. 'बिग बॉस'चा खेळ कसा खेळायचा हे शिवला कळलं आहे. त्यानुसार तो खेळत आहे. त्याची खेळी चाहत्यांच्याही पसंतीस उतरत आहे. टॉप तीन स्पर्धकांमध्ये शिवचं नाव घेतलं जातयं याचं नक्कीच कौतुक आहे. एक बहिण म्हणून मला शिवचा खूप अभिमान वाटतो".
शिवची बहिण पुढे म्हणाली,"लहानपणासूनच हिंदी 'बिग बॉस'मध्ये जाण्याची शिवची इच्छा होती. गेल्या काही दिवसांपासून तो त्या दृष्टीने प्रयत्न करत होता. प्रत्येक 'बिग बॉस'च्या दरम्यान त्याने घरात ठिक-ठिकाणी लिहिलं आहे,'बिग बॉस 14'चा विजेता शिव ठाकरे, 'बिग बॉस 15'चा विजेता शिव ठाकरे, 'बिग बॉस 16'चा विजेता शिव ठाकरे. हिंदी 'बिग बॉस'मध्ये जाण्याची शिवची खूप इच्छा होती. त्यामुळे 'बिग बॉस 16'साठी त्याला विचारणा झाल्यानंतर तो खूपच आनंदी झाला. त्यावेळी मालाडच्या त्याच्या फ्लॅटपासून ते दादरच्या सिद्धीविनायकापर्यंत तो पायी गेला होता".
शिवच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना शिवची बहिण म्हणाली,"शिवला लहानपणीपासूनच मजा करायला खूप आवडतं. तो प्रचंड खोड्या करायचा. तो खोडकर असला तरी तो खूप प्रामाणिक आहे. शिव त्याच्या त्वचेची खूप काळजी घेतो. धुळवडीला शिवचे मित्र त्याला रंग लावायला घरी यायचे. त्यावेळी शिव मागच्या दारातून बाहेर पडत असे आणि आख्या कॉलणीत मित्रांना फिरवायचा. सकाळी दहा वाजता घराबाहेर पडलेला शिव संध्याकाळी चार-पाच वाजले तरी मित्रांना भेटत नसे".
शिव ठाकरे होणार विजेता?
'बिग बॉस' मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे (Shiv Thakare) मराठीप्रमाणे हिंदी 'बिग बॉस'देखील गाजवतो आहे. 'बिग बॉस 16' शिव ठाकरे जिंकावा अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्याला पाठिंबा दर्शवत आहेत. शिवची खेळी चाहत्यांच्या पसंतीस उतरल्याने तो या पर्वाचा विजेता होऊ शकतो.
संबंधित बातम्या