Jeremy Renner: 'अॅव्हेंजर्स' (Avengers) स्टार जेरेमी रेनर (Jeremy Renner) याचा वर्षाच्या सुरुवातीला घराजवळील बर्फ हटवताना अपघात झाला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. काही दिवसांपूर्वी त्याच्या स्पोकपर्सननं सांगितलं की, जेरेमी रेनरची प्रकृती स्थिर आहे. गेल्या काही दिवसांपासून जेरेमी रेनर हा सोशल मीडियावर त्याच्या तब्येतीबाबत चाहत्यांना माहिती देत आहे. नुकतीच त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. "जसे कुटुंब आणि मित्रांसोबतचे प्रेम आणि बंध अधिक घट्ट होतात, तसेच ही 30 पेक्षा जास्त मोडलेली हाडे मजबूत होतील."असं या पोस्टमध्ये जेरेमी रेनरनं लिहिलं आहे.
रुग्णालयातील फोटो शेअर करुन जेरेमी रेनरनं त्याला कॅप्शन दिलं, "मॉर्निंग वर्कआऊट, नव्या वर्षात केलेल सर्व संकल्प बदलले आहेत. मला मेसेज करणाऱ्यांचे मी आभार मानतो. सर्वांना माझे प्रेम आणि आशीर्वाद." त्याच्या या पोस्टनं अनेकांचं लक्ष वेधलं आहे. जेरेमी रेनरच्या चाहत्यांनी त्याच्या या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. अभिनेता ख्रिस हेम्सवर्थनं जेरेमी रेनरच्या पोस्टला कमेंट केली आहे. "आम्ही तुझ्यावर प्रेम करतो", अशी कमेंट त्यानं केली आहे.
काही दिवसांपूर्वी जेरेमी रेनरनं त्याचा रुग्णालयातील सेल्फी शेअर केला होता. या सेल्फीला त्यानं कॅप्शन दिलं, 'थँक्यु फॉर काईंड वर्ड्स, मला सध्या टाईप करता येत नाही. पण मी हे सांगू इच्छितो की, मी सर्वांवर प्रेम करतो.'
जेरेमी रेनरनं या चित्रपटांमध्ये केलं काम
जेरेमी रेनर हा हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. मार्वल सिनेमॅटिक यूनिव्हर्समध्ये तसेच अॅव्हेंजर्सच्या सीरिजमधील त्यानं काम केलं आहे. लवकर तो 'मेयर ऑफ किंग्सटाउन'च्या दुसऱ्या सिझनमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा प्रिमिअर 15 जानेवारीला पॅरामाउंट प्लसवर होणार आहे.
महत्वाच्या इतर बातम्या: