सातारा : साताऱ्यातील (Satara News) कराडमध्ये दूध भेसळ (Milk Adulteration)   करणाऱ्या 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कराड येथील नवीन कवठे, केंजळे मळा, खराडे आणि हेळगाव या भागातील दुध संकलन केंद्रात भेसळ केली जात होती,  त्यांच्याकडून 9 हजार लिटर बनावट दुध  असा एकूण 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 


कराड येथील नवीन कवठे, केंजळे मळा, खराडे आणि हेळगाव या भागातील दूध संकलन केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे.   दुधात भेसळ करणारी एक टोळी कार्यरत होती. ही टोळी दुधामध्ये पॅराफिन,सोयाबिन तेल,व्हाईट लिक्विड,सोया ऑईलसह इतरही केमिकल मिक्स केले जात होते. दूध संकलन केंद्रातच दूध भेसळ करण्यात येत होती. पोलिसांनी  या नऊ जणांना  ताब्यात  घेतले असून नऊ हजार लिटर बनावट दूध जप्त करण्यात आले आहे. तसेच सुमारे 30 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 


बजरंग जाधव (रा. खराडे कराड),गणेश पनासे (रा. हेळगाव कराड), सोमनाथ कदम (रा. गायकवाडवाडी कराड),शरद घार्गे (रा. नवीन कवठे कराड),सचिन यादव (नवीन कवठे कराड), गणेश मसुगडे (रा. नवीन कवठे कराड),अर्जुन कुमार, श्रीकांत गौतम (रा. उत्तरप्रदेश), विवेक कुमार श्रीरामचंद्र कौतम (रा. उत्तरप्रदेश), अजय कुमार गौतम (रा. उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.


कारवाई करून भेसळ धंदा बंद का होत नाही? नागरिकांचा सवाल


 दरम्यान सदर भेसळ दूध सापडलेले साहित्य हस्तगत करण्यात आलं आहे. तसेच एक टाटा छोटा हत्ती,  महिंद्रा जीतो, पियागो अॅपे, छोटा हत्ती, मारुती रिट्स  ही वाहने जप्त करण्यात आली आहे. दूध व्यवसायातील भेसळ करणाऱ्या छोट्या केंद्रावर कारवाई झाली आहे. मात्र, दुधात भेसळ करणाऱ्या अनेक मोठ्या केंद्राकडे अन्न व औषध प्रशासन का दुर्लक्ष करत आहे? तिकडे का कारवाई करून भेसळ धंदा बंद होत नाही? असा सवाल नागरिक करत आहेत.


दूध भेसळ करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई 


भेसळयुक्त दुधामुळे जनतेच्या आरोग्यावर परिणाम होतो आहे. दूध भेसळ करणाऱ्या खासगी किंवा सहकारी दूध संस्थांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. तसेच मिल्कोमीटरचे नियमित प्रमाणीकरण दूध कंपन्यांना बंधनकारक असल्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. दुधाचे भाव, दुधातील फॅट आणि एस. एन. एफ. च्या प्रमाणानुसार ठरत असतात. फॅट आणि एस.एन.एफ. मोजण्यासाठी वापरण्यात येणारे मिल्कोमीटर हवे तसे सेट करता येत असल्यानं सेटिंग बदलून दुधाची गुणवत्ता मारली जाते.