सातारा :   सातारा शहरातील जिल्हा शासकिय रुग्णालयाच्या बाहेर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भल्यामोठ्या गटरातून एका युवकाला रिक्षा चालकांनी जिवंत बाहेर काढले. गटरात पडून तो वाहत  शासकिय रुग्णालयापर्यंत पोहचला होता. 


संदीप सर्जेराव जांभळे असे या युवकाचे नाव असून तो काल सायंकाळी पोवईनाका परिसरातील या गटरात पडला होता. मात्र बंदिस्त गटारामुळे त्याला बाहेर येता आले नाही. पावसाच्या पाण्याचा गटारातील प्रवाहामुळे तो आज सकाळी 9.30 वाजता वाहत जिल्हा शासकिय रुग्णालयापर्यंत पोहचला. तेथे थोडेफार गटर फुटलेले असल्यामुळे त्याने तेथून येणाऱ्या जाणाऱ्यांना गटरातून आवाज देण्यास सुरवात केली. त्याच ठिकाणी काही रिक्षा चालक रिक्षा लावून ग्राहकांची वाट पहात असताना त्यांना गटारातून आवाज एकून आल्याने त्यांनी या गटराच्या फटीजवळ जाऊन पाहिले असता आतून एक युवक ओरडत असल्याचे दिसले. त्यानंतर रिक्षाचालकांनी त्याला तसेच पुढच्या फटीपर्यंत येण्यास सांगितले. 


 पुढे आल्यानंतर तेथे फक्त त्याचे तोंड वर येऊ शकले. लोकांनी आपल्याला पाहिल्यामुळे तो आनंदी झाला. त्याने लोकांना मला बाहेर नंतर काढा पहिलांदा पिण्यासाठी पाणी द्या अशी याचना केली. त्याला लगेचच पाणी पाजण्यात आले. नंतर त्याला बिस्किटही देण्यात आले. एका ठिकाणची फरशी फोडून त्याला सुखरुप बाहेर काढण्यात आले. तोपर्यंत त्या ठिकाणी आलेल्या पोलिसांनी त्याला जिल्हा शासकिय रुग्णालयातच उपचारासाठी दाखल केले.


 संदीप हा सातारा तालुक्यातील सांबरवाडी येथील असून तो भांडणात पडला अशी त्याने प्राथमिक माहिती पोलिसांना सांगितली आहे. तो नेमका पडला की त्याला मारहाण करुन गटारात टाकण्यात आले हे मात्र अद्याप समजलेले नाही.


संबंधित बातम्या :