सातारा : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) वारे वाहू लागले आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असा सामना रंगणार असून सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेसाठी जोरदार तयारी केली आहे. पुढील काही दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री आणि आरपीआय आठवले गटाचे नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी साताऱ्यात मोठं विधान केलं आहे.
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आरपीआय सोबत यावे. मी आरपीआयचे नेतृत्व सोडायला तयार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून त्यांनी आरपीआयचे नेतृत्व हातात घ्यावे, आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करू, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता रामदास आठवले यांच्या वक्तव्यानंतर प्रकाश आंबेडकर नेमकं काय उत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुतीमध्ये आम्हाला गृहीत धरू नका
तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आरपीआय पक्षाला 8 ते 10 जागा मिळाव्यात, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. राज्यात महायुतीच्या 170 च्या पुढे जागा निवडून येतील, अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केलीय. राज्यात महायुतीमध्ये तीन प्रमुख पक्ष असले तर आम्हाला गृहीत धरू नका, असा इशारा देखील रामदास आठवले यांनी दिला आहे.
मी ज्यांच्या सोबत असतो त्यांचे सरकार येते : रामदास आठवले
मी ज्यांच्या सोबत असतो त्यांचे सरकार येते, अशी मिश्किल टिप्पणी देखील रामदास आठवले यांनी केली आहे.तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समान नागरी कायदा आणणार असं वक्तव्य केलं आहे. त्या बाबत रामदास आठवले यांनी देखील सहमती दर्शवत समान नागरी कायदा आला पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
राज ठाकरेंना सोबत घेऊ नका
दरम्यान, काही दिवसांपूर्वी रामदास आठवले यांनी मी सोबत असल्यामुळे महायुतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना घेऊ नये, असे वक्तव्य केले होते. राज ठाकरेंचा महायुतीला फायदा नाही. अजित पवारांमुळे महायुतीच कोणतंही नुकसान नाही. लोकसभेत आलेल्या 17 जागांमध्ये अजित पवारांचाही वाटा आहे. मात्र, राज ठाकरेंना सोबत घेऊ नका", असे त्यांनी म्हटले होते.
आणखी वाचा