Udayanraje Bhosale Meets Devendra Fadnavis : राज्यामध्ये भाजपची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यापासूनच माढा लोकसभेला अक्षरशः रणसंग्राम सुरू आहे. या ठिकाणी महायुती धर्म संकटात आली असतानाच आता साताऱ्यामध्ये सुद्धा खासदार उदयनराजे भोसले यांना पहिल्या यादीमध्ये उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. दुसरीकडे, उदयनराजे यांना महायुतीमध्येच सातारामधून विरोध होत आहे का? अशी सुद्धा चर्चा रंगली आहे. 


साताऱ्याची उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडणार?


या सर्व पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी सुद्धा मी अजूनही संन्यास घेतलेले नाही असे म्हणत उमेदवारीसाठी स्पष्ट इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये साताऱ्याची उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे लक्ष आहे. माढामध्ये महायुतीकडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील गट कमालीचा आक्रमक झाला असून त्या ठिकाणी मोहिते पाटील गट आणि रामराजे निंबाळकर सुद्धा एकत्र आल्याने माढामध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 


उदयनराजे आणि देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये भेट


हा एका बाजूने संघर्ष सुरू असताना दुसऱ्या बाजूने आता सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले यांची उमेदवारी संकटात आहे का? अशी सुद्धा चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांची काल (19 मार्च) भेट घेतल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे. काल रात्री उदयनराजे आणि  देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये भेट झाली. तब्बल दोन तास झालेल्या बैठकीचा तपशील समोर आला नसला, तरी उदयनराजे हे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. दोन दिवसांपूर्वीच भाजपचे संकटमोचक माणले जाणारे गिरीश महाजन यांनी सुद्धा उदयनराजे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली होती. मात्र, उदयनराजे यांनी थेट मुंबईमध्ये येऊन फडणसांची भेट घेतल्याने उमेदवारी कोणाच्या पारड्यात पडणार याची उत्सुकता आहे. 


महायुतीमधूनच उदयनराजेंना थेट विरोध?


दुसरीकडे अजित पवार गटाने सुद्धा सातारा लोकसभेला दवा केला आहे. शिवसेना शिंदे गटाकडूनही सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी सुद्धा उमेदवारीसाठी दावा केला आहे. त्यांनी आपला नैसर्गिक हक्क असल्याचे म्हटले आहे. भाजपकडून उमेदवारीवरून उदयनराजे प्रयत्नशील असतानाच भाजपकडूनच माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी सुद्धा उमेदवारीवर दावा केला आहे. त्यामुळे उमेदवारीच्या या स्पर्धेत नेमक्या कोणाच्या वाट्याला उमेदवारी येणार? याकडे लक्ष आहे. 


कार्यकर्ते आक्रमक, देव पाण्यात घातले 


उदयनराजे यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाले आहेत. कार्यकर्ते राजेंना तिकीट मिळण्यासाठी देव पाण्यात घालून बसले आहेत. एक व्हिडिओ सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झाला आहे. नंदीबैलाला उमेदवारी मिळेल की नाही याबाबत कार्यकर्ते विचार करत असलेला व्हिडिओ सोशल मीडियामध्ये कमालीचा व्हायरल झाला आहे. एकंदरीत माढा आणि सातारा या दोन जागेवरून महायुतीमध्ये धर्मसंकट उभारलं गेलं आहे. 


सातारा दौऱ्यात काय म्हणाले गिरीश महाजन?


गिरीश महाजन यांनी उदयनराजे यांची भेट घेतल्यानंतर चर्चेत मार्ग काढला जाईल, उमेदवारी नाकारण्याचा प्रश्नच नसल्याचे म्हटले होते. संसदीय  पक्षाशी चर्चा सुरु असल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळे साताऱ्यावरून भाजप गोंधळात असल्याचे स्पष्ट झाले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या