Satara Karad News : सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये (Karad) धक्कादायक घटना घडली आहे. कराडमध्ये एका व्यक्तीने गोळीबार केला आहे. या गोळीबारात अल्पवयीन मुलीसह 2 जण जखमी झाले आहेत. पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सुरेश काळे असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. सुरेश काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
नेमकी कशी घडली घटना?
दरम्यान, कराड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार होली फॅमिलीच्या मागील बाजूस ओम कॉलनी आहे. त्या कॉलनीमध्ये अक्षरा गृहनिर्माण सोसायटी आहे. त्यामध्ये 20 फ्लॅट आहेत. त्या सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप घोलप हे 12 वर्षांपासून वास्तव्यास आहेत. त्यास इमारतीत पहिल्या मजल्यावर पाच वर्षापासून सुरेश काळे राहत आहेत. आज रात्री साडेआठच्या सुमारास काळे त्या सोसायटीमध्ये आले होते. त्यांनी त्यांची दुचाकी रस्त्यावर आडवी लावली होती. तेथून अध्यक्ष घोलप त्याच वेळी जात होते. त्यावेळी त्यांनी काळे यांना दुचाकी बाजूला लावा लोकांना वाट द्या, असे सांगितले त्यावरून त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर काळे तिथून गेला मात्र अर्ध्या तासात तो पुन्हा त्यांच्या घरी गेला. त्यावेळी घोलप जेवत होते. बेल वाजल्याने त्यांनी दरवाजा उघडला तर समोर काळे होता. मला तुमच्याशी बोलायचं आहे असे त्याने घोलप यांना सांगितले. घोलप यांनी जेवण करून आलो. आत बसा असे म्हटले मात्र त्यांनी बसण्यास नकार दिला. ते जेवत असतानाच घरात घुसलेल्या काळे यांनी थेट फायरिंग चालू केली. गावठी कट्ट्यातून त्याने केलेल्या फायरिंगमध्ये घोलप यांच्या चेहऱ्याला गोळी लागली आहे. यावेळी तिथे त्यांची लहान मुलगी आली होती, तिलाही गोळ्या लागल्या आहेत.
पोलिसांवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न
फायरिंग झाल्यामुळं मोठा आवाज झाला. यानंतर घोलप कुटुंबीयांनी आरडा-ओरडा सुरु केली त्यामुळं घटनास्थळी लोक जमले. काही वेळात पोलिस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात पाठवले. त्यानंतर घटनेची माहिती घेतली. आरोपी सुरेश काळे याने स्वतःला घरात कोंडून घेतले होते. त्याच्यासोबत त्याच कुटुंबही होतं, त्याच्याकडे गावठी कट्टा पिस्तूल असल्यामुळे पोलिसांनी सावधगिरीने दरवाजा उघडण्याची विनंती केली. दरवाजा उघडल्यानंतर काळे याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला शांत करत ताब्यात घतलं. मात्र, त्याच्याकडील पिस्तूल कुठे आहे तो सांगत नव्हता. त्याने त्याच्या धान्याच्या डब्याखाली पिस्तूल लपवून ठेवली होती. पोलिसांनी ही पिस्तूल ताब्यात घेतली आहे. त्यासोबत 16 जिवंत काडतुसे देखील पोलिसांना घरात मिळाली आहेत. संशयित आरोपी हा पोलीस रेकॉर्डवरील होईल आहे अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.