सातारा : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यावर सरकार ठाम असून कालही सरकारची तीच भूमिका होती आणि आजही सरकारची तीच भूमिका आहे. हे सरकार तुमचंच आहे, त्यामुळे सरकार आकडता हात घेणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यासकट लाखो मराठा बांधवांनी मुंबईच्या दिशेने कूच केलीये. मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाचा आंदोलन करण्याचा मानस आहे. परंतु पोलिसांकडून मराठा समाजाला आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आलीये. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
सरकार आरक्षण देण्यासाठी काम करतंय. मनोज जरांगे यांना विनंती देखील करण्यात आलीये. सरकार आरक्षण देण्यासाठीच काम करतंय. आश्वासन नाही तर जे द्यायचं आहे, त्याचच काम सध्या सुरु आहे. त्यामुळे सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्यासह संपूर्ण मराठा समाजाला केलं आहे. दरम्यान मनोज जरांगे यांनी सुरु केलेले मराठा आंदोलन हे आज मुंबईच्या वेशीवर पोहचणार आहे. त्यासाठी नवी मुंबईत तयारी देखील सुरु करण्यात आलीये.
सरकार आरक्षणच्या बाबतीत सकारात्मक - मुख्यमंत्री शिंदे
सरकार आरक्षण देण्यावर ठाम आहे. त्यामुळे आंदोलन करण्याची काही गरज नाही. सरकार जर सकारात्मक नसेल तर आंदोलन करणं ठिक आहे. त्यामुळे सरकार सकारात्मक असेल तर सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे. हे सरकार तुमचंच आहे. सर्व मराठा बांधवांनाही मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
मागास आयोगासाठी 40 हजार लोक काम करतायत - मुख्यमंत्री शिंदे
इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू न लावता आरक्षण देणार आहोत. मागास आयोगाचं देखील काम सुरु आहे. 40 हजार लाख लोकं तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत. कुणबी नोंदी सापडल्यावर ते प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
अधिकारी जरांगेंच्या संपर्कात...
मनोज जरांगे यांच्यासोबत माझी अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. आमचे अधिकारी त्यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्या ज्या काही सूचना येत आहे, त्या सर्व सूचना तातडीने अमलात आणण्यासाठी प्रयत्न सुरू, असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
हेही वाचा :
मराठा आरक्षण देणारच, काल अन् आजही तीच भूमिका; मुख्यमंत्री शिंदे स्पष्टच बोलले