सातारा: राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण प्रचंड तापले आहे. या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी जातनिहाय जनगणनेची (Caste Census) मागणी केली आहे. मी जात पात मनात नाही. पण मराठा आरक्षणप्रश्नी (Maratha Reservation) 23 मार्च 1994 चा अध्यादेश हा कळीचा मुद्दा आहे. त्यात मराठ्यांना डावलून माळी, धनगर, वंजारी (Vanjari) असे सर्वांना आरक्षण देण्यात आले. त्यामुळे सध्या जातीजातीत तेढ निर्माण झाला असून दिवसेंदिवस जाती जातीत दुफळी माजत असल्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी कोरेगाव येथे आपल्या भाषणात सांगितलं आहे. त्यामुळे एकदाची जातनिहाय जनगणना करून ज्यांना त्यांना वाट्याप्रमाणे आरक्षण देऊन टाकावे, अशी रोखठोक भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी मांडली. 


सध्या जालन्यातली वडीगोद्री येथे सध्या लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरु आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा 10 वा दिवस आहे. त्यांना भेटण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ वडीगोद्री येथे दाखल झाले आहे. या शिष्टमंडळात छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गिरीश महाजन, अुतल सावे यांच्यासह 12 जणांचा समावेश आहे. हे सर्वजण आता लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची मनधरणी करणार आहेत.  तर दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हेदेखील आक्रमक झाले आहेत. आपण कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी बलिदान देऊ, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.


सरकार मराठा समाजाला फसवत आहे: अंबादास दानवे


सरकार मराठ्यांना फसवत आहे आणि दुटप्पी भूमिका घेत आहे.  सग्यासोयऱ्यांचे नोटिफिकेशन काढले परंतु ते झाल्याने जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी झाली नाही म्हणून मराठ्यांना न्याय मिळाला नाही, असे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले. ज्यांच्या नोंदी मिळत आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजे आणि त्या आधीपासून मिळतात. पाच नातेवाईकांचे नाव ओबीसीमध्ये असल्यास ओबीसींचे प्रमाणपत्र मिळते, सरकारने यामध्ये नवीन काही केले असे नाही, उलट सरकारने यात मराठ्यांची फसवणूक केली आहे.


लोकशाही मार्गाने आंदोलन करणे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. पण हिंसा, गावबंदी करणे चुकीचे आहे, परंतु असे केल्याने उपोषणकर्त्यांचा आंदोलकणाच्या विरोधात जनमत जात असते. हे सरकार आंदोलन पेटवत आहे, मराठयांनी ओबीसी विरोधात आणि ओबीसींना मराठ्याविरोधात आंदोलन केले पाहिजे असे सरकारलाच वाटते, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला. 


फुले, शाहू, आंबेडकर विचारांच्या महाराष्ट्रमध्ये असा जातीयवाद होणे महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारे आहे. जे कोणी राजकीय नेते आहेत, त्यांनी भूमिका घेताना राजकीय विद्वेष होऊ नये, याची भूमिका घेणे महत्वाचे आहे. ज्या पद्धतीने गोपीनाथ मुंडे ज्या पद्धतीने भूमिका घ्यायचे तशी भूमिका पंकजा मुंडे घेतात का हा माझ्यापुढे प्रश्न आहे. आणि त्याचे परिणाम त्यांना लोकसभा निवडणुकीत चांगले भोगायला भेटले आहेत, असेही अंबादास दानवे यांनी म्हटले.


आणखी वाचा


संभाजीनगरमध्ये पाऊल ठेवताच भुजबळ गरजले, मनोज जरांगेंना म्हणाले कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते!