वाई (जि. सातारा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या प्रचारात 400 पारचा नारा दिला होता. मात्र, जाहीर सभांमधून काँग्रेसच्या जाहीरनाम्यांची चर्चा करत असल्याची खोचक टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पीएम मोदींवर केली. वाईमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कारकीर्दीचा 10 वर्षाचा आढावा सादर करायला हवा होता. मात्र, एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. मोदी यांनी 400 पारची घोषणा दिली आणि काँग्रेस च्या जाहीरनाम्याची चर्चा करत आहेत. मोदी यांचा आत्मविश्वास ढळला असल्याची टीका त्यांनी केली.
सभेला माणसं मिळत नाहीत, पैसे देऊन माणसे गोळा करावी लागतात
ते पुढे म्हणाले की, या सभेची उपस्थिती पहिल्यास निवडणुकीचा निकाल काय लागणार? याबद्दल कुणाच्या मनात शंका असायचं कारण नाही. सभेला माणसं मिळत नाहीत, पैसे देऊन माणसे गोळा करावी लागत असल्याची टीका चव्हाण यांनी केली. देशात आज नोकऱ्या नाहीत, नरेंद्र मोदींनी अर्थ व्यवस्थेचं वाटोळं करून टाकलं असल्याची टीका त्यांनी केली.
त्यांना धडा शिकवण्याची ताकद सातारकरांमध्ये
दरम्यान, या सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, गुजरातमध्ये मोदी मुख्यमंत्री असताना एका भगिनीच्या घरात हल्ला झाला. अत्याचार केले, सासऱ्यांची हत्या केली. यामध्ये ज्यांना 11 वर्षांची शिक्षा झाली. मात्र, मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांची सुटका केली आणि गळ्यात हार घालत सन्मान केला. स्त्रियांची अब्रू घेणाऱ्यांचा सन्मान करण्याचं धोरण जे स्वीकारतात ते देशाचे हितचिंतक असू शकत नाही. त्यांना मत मागायचा अधिकार नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी हल्लाबोल केला.
हे भ्रष्टाचार घालवू म्हणतात. मात्र, भ्रष्टाचार घालवायचा ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्या कारवाई केली गेली. सत्तेचा गैरवापर कसा करतात याची उदाहरणं दिली. जे देशाच्या हिताचं नाही त्यांना धडा शिकवायची ताकद सातारकरांमध्ये आहे. शशिकांत शिंदे हे कष्ठकरी कुटूंबातील आज लोकसभेला उमेदवार दिला असून तुमच्या पाठिंब्यावर यशस्वी होतील, असेही त्यांनी सांगितले. इंग्रजांच्या काळात सातारकर घाबरला नाही. मात्र किरकोळ लोकांसमोर सुद्धा घाबरणार नसल्याचे ते म्हणाले.
माझी अर्धी निवडणूक सोपी झाली
दरम्यान, या सभेत बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, आजची सभा फार ऐतिहासिक आहे. साहेब आपले धन्यवाद मानतो आपण मला उमेदवारी जाहीर केली. त्यांनी सांगितले की, वाईचा मतदारसंघ उद्याचा खासदार ठरवणार आहे. आज सातारा जिल्ह्यात 2 सभा होत आहेत. एक कराडला होती आणि एक वाईला होती. मला समोर उमेदवार भेटल्यामुळे माझी अर्धी निवडणूक सोपी झाल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या