सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजप आमने सामने आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे भाजपनं सातारा लोकसभा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जागा वाटपाच्या तडजोडीतून आपल्याकडे घेत राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिलेली आहे. उदयनराजे भोसले आणि सांगलीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कराडमध्ये सभा होणार आहे. तर, शरद पवार देखील साताऱ्याच्या दौऱ्यावर असून ते शशिकांत शिंदे यांच्यासाठी सभा घेणार आहेत.


प्रचाराचा सुपर मंडे, मोदी कराडमध्ये


महायुतीच्या जागावाटपात सातारा आणि सांगली लोकसभा मतदारसंघ भाजपकडे आहे. साताऱ्यातून राज्यसभा उमेदवार उदयनराजे भोसले आणि सांगलीतून संजयकाका पाटील लोकसभेच्या रिंगणात आहेत. संंजयकाका पाटील तिसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात आहेत. उदयनराजे भोसले भाजपकडून दुसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. सातारा आणि सांगली लोकसभेच्या भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची कराडमध्ये सभा होणार आहे. या सभेला सातारा लोकसभा मतदारसंघातील तसेच सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजप आणि महायुतीच्या घटकपक्षांचे नेते कार्यकर्ते उपस्थित राहतील.


शरद पवारांची शशिकांत शिंदेंसाठी सभा


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून सातारा लोकसभा मतदारसंघात विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शशिकांत शिंदे यांनी देखील उमेदवारी मिळाल्यानंतर मतदारसंघ पिंजून काढला आहे. शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी शरद पवार आज साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांची सभा वाई तालुक्यात होणार आहे. 


साताऱ्यात उदयनराजे भोसले शशिकांत शिंदे आमने सामने


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जागा वाटपाच्या तडजोडीतून सातारा लोकसभा मतदारसंघ खेचून आणत भाजपनं या ठिकाणी उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर केली. उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील महायुतीच्या नेत्यांना सोबत घेत प्रचार सुरु केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं त्यांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढवलेला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी देखील मतदारसंघात भेटी गाठी, प्रचार फेऱ्या, सभा आदीच्या माध्यमातून प्रचार सुरु ठेवलाय. शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील देखील कामाला लागले आहेत. साताऱ्यात 7 मे रोजी मतदान पार पडणार आहे.


संबंधित बातम्या : 


मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचा महायुतीला पाठिंबा, अण्णा भाऊ साठे महामंडळ कथित घोटाळ्याप्रकरणी होते तुरुंगात


Raj Thackeray: राज ठाकरेंची तोफ कोकणात धडाडणार? नारायण राणेंच्या प्रचारासाठी सिंधुदुर्गात सभा घेण्याची शक्यता