Crime News : नागपाडा पोलिसांनी झारखंडमधील जामतारा येथून तीन सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांनी गुगलवर कुरिअर कंपनीची हुबेहूब संकेतस्थळे तयार करून विविध राज्यातील सर्वसामान्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी सतार अन्सारी, रियाज अन्सारी आणि नझीर अन्सारी या तिघांना अटक केली आहे. 


नागपाडा येथील एकाने याबाबत फिर्याद दिली आहे. तक्रारदाराचे कुरिअरमार्फत पार्सल येणार होते. पार्सल विनाविलंब हवे असेल तर पैसे भरावे लागतील असे एका प्रतिनिधीने फोन करून त्याला सांगितले. त्यासाठी तक्रारदाराला एक लिंक देण्यात आली आणि त्यावर पाच रूपये भरण्यास सांगितले. प्रतिनिधीने पाठविलेल्या लिंकवर पैसे पाठवत असताना या तरुणाच्या खात्यामधून 95 हजार रुपये वजा झाले. ही बाब लक्षात येताच या तरुणाने नागपाडा पोलिस ठाण्यात तक्रार केली. मोबाइल क्रमांकावरून आणि तांत्रिक माहीतीच्या आधारे सायबर पोलिसांनी आरोपींचा ठावठिकाणा शोधून काढला आणि तिघांनाही बेड्या ठोकल्या.   


Crime News : फिल्मी स्टाईलने पाठलाग करून आरोपींना ठोकल्या बेड्या  


तिन्ही संशयित आरोपी हे झारखंडमधील जामतारा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर नागपाडा पोलिस तेथे पोहोचले. पोलिस आल्याची कुणकुण लागताच तिन्ही आरोपींनी तेथून पळ काढला. परंतु, पोलिसांनी पाठलाग  करून तिघांच्याही मुसक्या आवळल्या. 


या आरोपींनी मुंबई, दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, आसामसह संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारे ऑनलाईन फसवणूक करून गुन्हे केले असल्याची शक्यता असून त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलद्वारे पोलिस पुढील तपास करीत आहेत, अशी माहिती मुंबई झोन तीनचे पोलिस उपायुक्त अकबर पठाण यांनी दिली आहे. 


कशी होते फसवणूक?   


कुरिअरशी संबंधीत अडचणीसाठी नागरिकांनी गुगलवर सर्च केल्यानंतर फेक साईटवर उपलब्ध असलेले आरोपींचे मोबाईल क्रमांक दिसतात. त्यावर कॉल केला असता समोरून नागरिकांना दुसऱ्या मोबाईलवरून कॉल येईल असे सांगून दुसऱ्या मोबाईलवरून कॉल करून लिंक पाठविली जाते. कुरिअर लवकर हवे असेल या लिंकवर क्लिक करून आपल्या बँक डिटेल्स भरण्यास सांगितले जाते. त्यानंतर या लिंकद्वारे पाच रूपयांचे शुल्क भरण्यास सांगून  नागरिकांची बँक खात्याची माहिती प्राप्त करून any desk द्वारे त्यांच्या खात्यातून रक्कम काढून घेतली जाते.


महत्वाच्या बातम्या 


Gangster Prasad Pujari Detained: गँगस्टर प्रसाद पुजारी हाँगकाँगमधून ताब्यात, भारतात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न