LIC Investment In Adani :  अमेरिकेतील रिसर्च फर्म हिंडेनबर्गचा अहवाल प्रकाशित झाल्यानंतर अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरावर परिणाम झाला आहे. मागील एक महिन्याच्या कालावधीत शेअर बाजारात सूचीबद्ध असणााऱ्या अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात मोठी घसरण झाली आहे. हिंडेनबर्ग रिपोर्टचा परिणाम देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीवरही याचा परिणाम झाला आहे. एलआयसीच्या शेअर दराने आज दिवसभरातील व्यवहारात आतापर्यंतचा नीचांक गाठला आहे. 


आज शेअर बाजारात विक्रीचा दबाव दिसून आला. एलआयसीच्या शेअर दरात घसरण झाली. आज, सोमवारी 27 फेब्रुवारी रोजी एलआयसीच्या शेअर दरात जवळपास तीन टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे एलआयसीचा शेअर दर 566 रुपयांपर्यंत घसरला. बाजार बंद होताना हा शेअर दर 2.88 टक्क्यांच्या घसरणीसह 567.75 रुपयांवर स्थिरावला. 


गुंतवणूकदारांना 40 टक्के नुकसान


अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर दरात घसरण सुरू झाल्यानंतर त्याचा परिणाम एलआयसीच्या शेअर दरावर झाला. एलआयसीचा शेअर दर आपल्या आयपीओच्या किंमतीपेक्षा जवळपास 40 टक्क्यांनी घसरला आहे. एलआयसीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठं नुकसान सहन करावे लागत आहे. आयपीओत एलआयसीच्या शेअर दराची किंमत 949 रुपये प्रति शेअर इतकी होती. 


एलआयसीच्या शेअर दरात घसरण का?


हिंडेनबर्गचा अहवाल 24 जानेवारी 2023 मध्ये जाहीर झाला होता. त्या दिवशी एलआयसीचा शेअर दर 702 रुपयांवर होता. आता, त्या दिवसापासून आतापर्यंत एलआयसीच्या शेअर दरात 19.30 टक्क्यांची घसरण झाली आहे. अदानी समूहातील कंपन्यांमध्ये एलआयसीचीदेखील गुंतवणूक आहे. या गुंतवणुकीबाबत स्पष्टीकरण एलआयसीने दिले असले तरी त्याचा परिणाम एलआयसीच्या शेअर दरावर झाला आहे. 


हिंडेनबर्गचा रिपोर्ट येण्याआधी अदानी समूहातील कंपन्यांमध्ये एलआयसीने केलेल्या शेअर गुंतवणुकीचे मूल्य 82 हजार कोटी रुपये झाले होते. मात्र, सतत होत असलेल्या घसरणीमुळे एलआयसीची अदानी समूहातील गुंतवणूक ही तोट्यात गेली असल्याची माहिती आहे. अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्ससोबत एलआयसीचे शेअर दर कोसळू लागले आहेत. शेअर बाजारातील गुंतवणूकदार कंपनीची वाटचाल, व्यवसायातील फायदा-तोटा, इतर ठिकाणी असलेली गुंतवणूक आदी विविध घटकांचा विचार करून गुंतवणूक करतात. अदानी समूहात एलआयसीची गुंतवणूक असल्याचा फटका एलआयसीच्या शेअर्सला पडत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. 


अदानी समूहातील कंपन्यांमध्ये एलआयसीची गुंतवणूक किती?


अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये एलआयसीची गुंतवणूक आहे. मुंबई शेअर बाजारातील 31 डिसेंबर 2022 मधील माहितीनुसार, एलआयसीची अदानी एंटरप्रायझेसमध्ये 4.23 टक्क्यांची गुंतवणूक आहे. अदानी ट्रान्समिशनमध्ये 3.65 टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये 5.96 टक्के आणि अदानी ग्रीन एनर्जीमध्ये 1.28 टक्के हिस्सा आहे. अदानी समूहाच्या सिमेंट कंपन्यांमध्येही एलआयसीची गुंतवणूक आहे. अंबुजा सिमेंट मध्ये 6.33 टक्के आणि ACC मध्ये 6.41 टक्के शेअर्स हे एलआयसीकडे आहे. त्याशिवाय, अदानी पोर्ट्सचे LIC कडे  9.14 टक्के शेअर्स आहेत.