Gangster Prasad Pujari Detained in Hong Kong : गँगस्टर प्रसाद पुजारीला (Pasad Pujari) हाँगकाँगमधून (Hong Kong) ताब्यात घेण्यात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, इंटरपोलने यासंदर्भात माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिनी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीनं गँगस्टर प्रसाद पुजारीला ताब्यात घेतलं आहे. सुभाष विठ्ठल पुजारी उर्फ ​​प्रसाद पुजारी हा कुमार पिल्लईच्या टोळीचा विश्वासू सदस्य आणि सेकंड-इन-कमांड होता. त्याचे एका चिनी महिलेशी लग्न झालं असून त्याला पाच वर्षांचा मुलगा आहे.


प्रसादला देशात आणण्यासाठी भारत सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी सरकारकडून प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र भारताचा चीनसोबत प्रत्यार्पण करार नाही, त्यामुळे आता ही प्रक्रिया कशी पूर्ण होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, पुजारीवर मुंबई शहरात डझनभर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 2020 मध्ये, विक्रोळीतील एका बिल्डरला धमकावून त्याच्याकडून 10 लाख रुपयांची मागणी केल्याबद्दल पुजारी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.


कशी केली अटक? 


मुंबई पोलीस गेल्या काही दिवसांपासून गँगस्टर प्रसाद पुजारीच्या शोधात होते. गँगस्टर पुजारीनं चिनी महिलेशी लग्नगाठ बांधली असून तो आपल्या पत्नीसोबत हाँगकाँगहून शेनझेनला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हा सापळ रचून अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं. 


पुजारी चीनच्या ग्वांगडोंग प्रांतातील शेनझेन शहरात राहत असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. त्याचे एका चिनी महिलेशी लग्न झालं आहे आणि त्याला एक मुलगा आहे. पुजारीला भारतात आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे, पण यासाठी अनेक भारताला अडथळ्यांचा सामना करावा लागणार आहे. चीन आणि भारत यांच्यात प्रत्यार्पण करार नाही. त्यामुळे गँगस्टर पुजारीचं प्रत्यार्पण करणं भारत सरकारसमोर मोठं आव्हान असणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 


गँगस्टर प्रसाद पुजारीवर मुंबई आणि ठाण्यात खंडणीचे सुमारे 15 ते 20 गुन्हे, एक खून आणि खुनाच्या प्रयत्नाचे तीन गुन्हे दाखल आहेत. मुंबईत खंडणी रॅकेट चालवल्याबद्दल गुन्हे शाखेनं त्याची आई इंदिरा यांना अटक केली होती. 2020 पर्यंत प्रसाद पुजारी मुंबईत खूपच सक्रिय होता. 2020 मध्ये, विक्रोळीतील तगरे नगर येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार केल्याप्रकरणी खंडणी विरोधी सेलने सागर जाधव आणि इतर पाच जणांना अटक केली होती. या गोळीबार प्रकरणाच्या तपासादरम्यान, पोलिसांना प्रसाद पुजारीची आई इंदिरा यांचाही यामध्ये सहभागी असल्याची माहिती मिळाली होती.