Shankarrao Kharat Janmashtabdi Sahitya Sammelan : आटपाडीचे सुपुत्र, थोर साहित्यिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आटपाडी येथे डॉ. शंकरराव खरात प्रतिष्ठानतर्फे 11 व 12 जुलै रोजी दोनदिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 


या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि डॉ. शकुंतला शंकराव खरात आहेत. श्रीमंत बाबासाहेब देशमुख साहित्यनगरीत आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन होत आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे असणार आहेत.


या साहित्य संमेलनाचा सांगता समारंभ 12 जुलै रोजी उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल आणि आटपाडीचे सुपुत्र राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यावेळी एबीपी माझा वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक आणि आटपाडीचे सुपूत्र राजीव खांडेकर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती असणार आहे.


उद्घाटन सोहळ्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी मंत्री विश्वजीत कदम, खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर,भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, आमदार गोपीचंद पडळकर,  माजी आमदार सदाशिवराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. 


दुसऱ्या सत्रामध्ये दुपारी एकनंतर भारूड व जुगलबंदी, डॉ. शंकरराव 7 खरात व्यक्ती व वाङ्मय या विषयावर योगीराज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. रणधीर शिंदे आणि डॉ. राजा जगताप यांच्या उपस्थितीत परिसंवाद होणार आहे. ज्येष्ठ कवी नारायण सुमंत यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार आहे. रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. 


12 जुलै रोजी सकाळी माणदेशी साहित्य व परंपरा या विषयावर परिसंवाद होणार आहे. यानंतर माजी राज्यपाल राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथ प्रकाशन, माण देशातील साहित्यिक व कलावंतांचा गौरव होणार आहे. 11 वाजता ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा इंगवले यांची प्रकट मुलाखत होणार आहे. साडे बाराच्या सुमारास सुभाष कवडे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार आहे. दुपारी तीन वाजता बालसाहित्य व वाचन कट्टा होणार आहे. चार वाजता संमेलनाची सांगता माजी राज्यपाल राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आणि राजीव खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.