Sangli Mass Murder : मिरज तालुक्यातील म्हैसाळमधील हत्याकांड प्रकरणात ज्या मांत्रिकाने विषारी गोळ्या देऊन वनमोरे कुटूंबाचा जीव घेतला त्या मांत्रिकाला विषारी औषधाच्या गोळ्या देणाऱ्या पुण्यातील चौघांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची सखोल चौकशी केली जात आहे. दरम्यान, मांत्रिक अब्बास महंमदअली बागवानच्या बहिणीचा शोध सुरु आहे. पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर व स्थानिक गुन्हे अन्वेषणची टीम अधिक तपास करत आहे.
म्हैसाळमधील डॉ. माणिक आणि पोपट वनमोरे यांना गुप्तधन शोधण्याचा नाद लागला होता. त्यांच्या संपर्कात सोलापूर येथील मांत्रिक अब्बास बागवान हा होता. ‘गुप्तधन शोधून देतो,’ असे सांगून वेळोवेळी त्याने पैसे उकळले होते. अखेर गुप्तधन मिळत नसल्याने वनमोरे यांनी पैशांसाठी तगादा लावला होता. त्यावेळी मांत्रिकाने या कुटुंबाचा काटा काढण्याचे ठरविले.
१९ जूनची तारीख वनमोरे यांना दिली होती. त्यानुसार मांत्रिक बागवान व त्याचा चालक धीरज सुरवसे त्या दिवशी सोलापूरमधून म्हैसाळला आले. रात्री नऊच्या सुमारास डॉ. माणिक यांच्या घरी दोघांनी जेवण केले. डॉक्टर दांपत्यास अकराशे गहू काढून दिले. ते सात वेळा मोजण्यास सांगितले. त्या वेळी विषाच्या गोळ्या मांत्रिकाने आणल्या होत्या. त्यांची पावडर करून ती नऊ बाटल्यांमध्ये आधीच भरलेल्या द्रवात मिसळली. रात्री एकच्या सुमारास पोपट वनमोरे यांचे कुटुंब संपवले. त्यानंतर पहाटे चारच्या सुमारास डॉ. माणिक यांचे कुटुंब संपवून कृत्य करण्यापूर्वी लिहून घेतलेली चिठ्ठी खिशात ठेवून पसार झाले.
दरम्यान, मांत्रिकाने विषारी औषधाच्या आणलेल्या गोळ्या या पुण्यातील काहींकडून आणल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार पोलिसांनी पथके तयार करून चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Crime News Sangli : व्हॉटसअॅप स्टेटसवर स्वतःलाच श्रद्धांजली वाहत संपवल आयुष्य; प्रेमभंगातून टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय
- Sangli Crime : दोन वर्षाच्या लेकीचा घास लागून मृत्यू, विरह सहन न झाल्याने आई वडिलांची एकाच दोरीने गळफास घेत आत्महत्या
- Eknath Shinde Cabinet : शिंदे सरकारमध्ये सांगली जिल्ह्यातून कोणाची वर्णी लागणार?